West Bengal By poll Results Update : ताजी बातमी : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जिंकल्या

भवानीपूर : पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठा विजय मिळविला आहे. त्यांनी भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८८३२ मतांनी पराभव केला. या पोट निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना एकूण ८४,७०९ मते मिळाली. तर भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांना २६,३२० मते मिळाली. याशिवाय तिसरे सीपीएमचे उमेदवार श्रीजीब यांना केवळ ४२०१ मतांवर थांबावे लागले.
या निकालानंतर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांनी आपला पराभव स्वीकारून ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. भवानीपूरमधील विजयानंतर ममता बॅनर्जी लोकांना संबोधित करताना म्हणाल्या, या विजयासाठी मी सर्वांचे आभार मानते. भवानीपूरमध्ये ४६ टक्के गैरबंगाली मतदार आहेत, प्रत्येकाने मला मतदान केले. यावेळी ममतांनी केंद्रावरही निशाणा साधला. एवढ्या लहानशा विधानसभा मतदारसंघासाठीही साडेतीन हजार केंद्रीय दलाचे जवान तैनात करण्यात आले. आमच्या विरुद्ध षडयंत्र रचले गेले. त्यांनी नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवाचा उल्लेख करत, हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे, त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही, पण इथे काय झाले, हे लोकांनी पाहिले आहे, असेही ममता म्हणाल्या.
निवडणूक आयोगाची विजयी उमेदवारांना सूचना
दरम्यान पश्चिम बंगालमध्ये तीन विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहून कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करण्याचे निर्देश दिले आहेत. याच बरोबर, निकाल आल्यानंतर राज्यात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, यासाठी कडक उपाय योजना आखण्यात याव्यात, असे या पत्रात सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्या घटनांसाठी भाजपने टीएमसी समर्थकांना जबाबदार धरले होते.