IndiaNewsUpdate : देशातील पेट्रोल डिझेलच्या किमतीने केली शंभरी पार !!

नवी दिल्ली : देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज शनिवारीही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार वाढताना दिसत आहे. दरम्यान देशातील मोठ्या शहरांमध्ये नोंद करण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरीपार गेल्या. त्यामुळे आज देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती सर्वाधिक झाल्याची देखील नोंद करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचे दर प्रतिलीटर १०२ रुपये १४ पैसे इतके झाले आहेत. तर मुंबईत हाच आकडा १०८ रुपये १९ पैसे प्रतिलीटर इतका वाढला आहे. त्याचबरोबर या दोन्हीही शहरात डिझेलचे दर अनुक्रमे ९० रुपये ४७ पैसे आणि ९८ रुपये १६ पैसे इतके झाले आहेत. तर कोलकात्यामध्ये देखील पेट्रोलने केव्हाच शंभरी गाठली आहे. आज कोलकात्यामध्ये पेट्रोल १०२ रुपये ७७ पैसे प्रतिलीटर तर डिझेल ९३ रुपये ५७ पैसे प्रतिलीटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये हे दर अनुक्रमे ९९ रुपये ८० पैसे आणि ९५ रुपये ०२ पैसे प्रतिलीटर असे आहेत.
कच्च्या तेलाच्या दारात वाढ
दरम्यान राज्यांकडून पेट्रोल डिझेलवर लावल्या जाणाऱ्या करांमध्ये तफावत असल्यामुळे हे दर वेगवेगळे ठरत असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या कमी अधिक होणाऱ्या किंमतीमुळे या दारांवर मोठा प्रभाव पडतो. शनिवारच्या आकडेवारीनुसार या किंमती ७८.६४ डॉलर प्रतीबॅरल इतक्या आहेत. देशात सप्टेंबर महिन्यात ५ तारखेपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, आंतरराष्ट्रीत बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढू लागल्यामुळे अखेर रोज बदलणाऱ्या इंधन दरांची व्यवस्था भारतीय कंपन्यांनी पुन्हा एकदा सुरू केली. त्यानुसार २४ सप्टेंबरपासून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन , भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या भारतीय तेल कंपन्यांनी रोज इंधनाचे सुधारीत दर देण्यास सुरुवात केली आहे.