MaharashtraPoliticalUpdate : मराठवाड्यामध्ये लाखो हेक्टर शेतीचे नुकसान , तातडीच्या मदतीची फडणवीस यांची मागणी

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून गुलाब चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन त्याचा फटका महाराष्ट्राच्या अनेक भागांना बसला आहे. मराठवाड्यामध्ये लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत ४३६ मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज असून ही मदत तातडीने दिली जावी, अशी विनंती देखील त्यांनी राज्य सरकारला केली आहे.
राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. #MaharashtraRains #Marathwada
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) September 29, 2021
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून राज्यात पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि राज्य सरकारची भूमिका यावर भाष्य केले आहे. “राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळे आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही”, असे फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींची आकडेवारी आज राज्य सरकारकडून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यासंदर्भात फडणवीस यांनी भूमिका मांडली आहे. “मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात ४३६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे”, असं त्यांनी नमूद केलं आहे. दरम्यान कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांमुळे शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे”, असेही त्यांनी म्हटले आहे.