CongressNewsUpdate : काँग्रेस अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्व गंभीर , काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीची तयारी

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसच्या राजकारणामुळे पक्षातील हालचाली वाढल्या असून नेत्यांमधील वादांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे. जी- २३ नेत्यांनी या आधीच पक्षात संघटनात्मक निवडणुकांची मागणी केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर आणि हायकमांडवर प्रश्न उपस्थित करणारे पत्र लिहिले होते . या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मनीष तिवारी, भूपेंद्र हुड्डा, पृथ्वीराज चव्हाण, शशी थरूर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता.
एकूणच काँग्रेस पक्षातील नेत्यांची मते विचारात घेता , काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी, जी -२३ नेते पक्षात संघटनात्मक निवडणुकांची मागणी करत आहेत. ही मागणी लक्षात घेता, काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची (CWC) बैठक लवकरच बोलावण्यात येईल, असे सांगितले आहे.
Following the demand from G-23 leaders, a meeting of the Congress Working Committee (CWC) will be called soon: Congress leader Randeep Surjewala
G-23 leaders are demanding organizational elections in the party.
— ANI (@ANI) September 30, 2021
दरम्यान कपिल सिब्बल यांनी पंजाबच्या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेस हायकमांडवर घणाघाती हल्ला चढवला होता. ‘मी तुमच्याशी जड अंतःकरणाने बोलतोय. मी अशा पक्षाचा आहे, ज्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. पण आमचा पक्ष आज ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत मी पाहू शकत नाही, असे सिब्बल यांनी म्हटले होते. सिब्बल यांच्या या वक्तव्यानंतर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर टोमॅटो फेकून आंदोलन केले होते. तसेच त्यांना ‘गेट वेल सून कपिल सिब्बल’चे फलक दाखवण्यात आले होते.त्यानंतर आज गुरुवारी जी -२३ चे सर्व दिग्गज नेते सिब्बल यांच्या बाजूने उतरले. त्यांनी जाहीरपणे सिब्बल यांची बाजू घेतली. यामध्ये शशी थरूर, आनंद शर्मा, मनीष तिवारी यांसारख्या नेत्यांचा यात समावेश होता.
काँग्रेस पक्षातील नेत्यांची भावना लक्षात पक्षातील वरिष्ठ नेते आक्रमक झाल्याने काँग्रेस हायकमांडने यातून सबुरीने मार्ग काढण्याची तयारी चालवली आहे. यातून वेळीच मार्ग काढला नाही तर पक्षात दोन गट पडू शकतात. त्यापैकी एक गांधी घराण्याच्या बाजूने आणि दुसरा गट पक्षात सुधारणांच्या मागणी करणाऱ्या नेत्यांचा असू शकतो अशी भीती काँग्रेस हायकमांडला वाटत असल्याने बैठकीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Chandigarh: Navjot Singh Sidhu leaves from Punjab Bhavan after meeting CM Charanjit Singh Channi pic.twitter.com/6QcQZLdP5a
— ANI (@ANI) September 30, 2021
उद्या होईल संयुक्त पत्रकार परिषद
पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी गुरुवारी नवज्योत सिंग सिद्धू यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास बैठक चालली. चंदिगडमधील पंजाब भवनमध्ये ही बैठक चालली. या बैठकीनंतर कुठलीही माहिती दिली गेली नाही. कलंकित अधिकारी आणि मंत्र्यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त करत सिद्धूंनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धूंची आज दुपारी बैठक झाली. ही बैठक ६ वाजता संपली. जवळपास दोन तास ही बैठक चालली. यानंतर मुख्यमंत्री चन्नी हे ६ वाजता बैठकीतून सर्वप्रथम बाहेर पडले. मुख्यमंत्री चन्नी गेल्याच्या आर्ध्यातासानंतर सिद्धू तिथून निघाले. दरम्यान काँग्रेस नेते भूपिंदर सिंग गोरा यांनी पक्षात सर्व काही आलबेल असून उद्या सर्व नेते मिळून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहेत आणि सर्व माहिती दिली जाईल, असे म्हटले आहे.