CongressNewsUpdate : पंजाब प्रकरणावरून काँग्रेसअंतर्गत नेत्यांमध्ये मोठी धुसफूस !!

नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्री बदलाच्या निर्णयावरून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठी धुसफूस चालू असल्याचे चित्र आहे. काल या प्रकरणात पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आपला राग आळवताच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात पवित्रा घेत थेट त्यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावरून काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेस सुप्रिमो सोनिया गांधी यांना पत्र लिहून कपिल सिब्बल यांना समर्थन देत आपल्या भावना कळवल्या आहेत.
दरम्यान आपल्या पत्रात आझाद यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावावी, अशी मागणी सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. दुसरीकडे कपिल सिब्बल यांच्या घरासमोर झालेल्या निषेधाच्या घटनेवरुन राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसने पंजाबात मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना बदलल्यानंतर ज्यांच्यामुळे काँग्रेसने हे धाडस केले ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नवज्योत सिद्धू यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस नेतृत्वानेही सिद्धू यांच्याबद्दल कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले अमरिंदर भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर इतर काँग्रेस नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहेत.
आनंद शर्मा यांच्याकडून कपिल सिब्बल यांचे समर्थन
याबाबत आनंद शर्मा यांनी ट्विट करत कपिल सिब्बल यांच्या घरावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. तसेच, सिब्बल यांच्या घराबाहेर सुरू असलेली गुंडागर्दी आणि हल्ल्याचे वृत्त त्रासदायकआहे. याप्रकारची कृती पक्षाला बदनाम करते, आणि निषेधार्ह आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारा काँग्रेस पक्ष आहे. विभिन्न विचार हेच राजकीय लोकशाहीची निशाणी आहे. असहिष्णुता आणि हिंसा हे काँग्रेसच्या विचाराविरुद्ध आहे. त्यामुळेच, वरील घटनेला जे जबाबदार आहेत, त्यांच्याविरुद्ध पक्षाने कडक कारवाई करावी, अशी मागणीही आनंद शर्मा यांनी केली आहे. यांसदर्भात त्यांनी सोनिया गांधींना उद्देशून ट्विट केले आहे.
कपिल सिब्बल यांनी नेमके काय म्हटले ?
कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्षपदाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “काँग्रेसमध्ये निवडून आलेला अध्यक्ष नाही. निर्णय कोण घेत आहे? हे आम्हाला माहिती ना्ही.”, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. या विधानासह त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलवण्याची मागणी देखील केली. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी अध्यक्षपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दिल्ली काँग्रेसच्या या संतप्त कार्यकर्त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानाबाहेर निदर्शनं केली. ‘लवकर बरे व्हा कपिल सिब्बल’ असे फलक झळकावत निषेध नोंदवला. त्यामुळे येत्या काही दिवसात काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे काँग्रेस नेते अजय माकन यांनी कपिल सिब्बल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “त्यांना काँग्रेसने ओळख दिली आहे. संघटनात्मक पार्श्वभूमी नसताना सोनिया गांधी यांनी कपिल सिब्बल यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद दिले . पक्षात सर्वांच ऐकले जाते . पक्षाला छबी खराब करण्याच प्रयत्न करू नका. पक्षाने तुम्हाला ओळख दिली आहे.” अशी टीका त्यांनी यावेळी केली.
काँग्रेस पक्षात दोन गट
दरम्यान काँग्रेस पक्षाच्या जी-२३ नेत्यांनी मागच्या वर्षी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व बदलाच्या सूचना केल्या होत्या. त्यावरून काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या नेत्यांना खडे बोल सुनावले होते. जी २३ मधील नेते करोनाकाळात बेपत्ता होते, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती. त्याला कपिल सिब्ल यांनी उत्तर दिले होते . काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक २३ जूनला होणार होती. मात्र कोरोनाचे कारण देत पुन्हा एकदा निवडणूक टाळण्यात आली होती. तारीख जाहीर झाल्याच्या अवघ्या काही तासातच निर्णय बदलण्यात आला होता. विशेष म्हणजे अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदा टाळण्यात आली. त्यामुळे पुढची तारीख जाहीर होईपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद राहाणार आहे.
गुलाब नबी आझाद यांचेही सोनियांना पत्र
कपिल सिब्बल यांनी दिल्लीत माध्यमांशी चर्चा करताना काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक बोलावावी, अशी मागणी करत काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षच नसताना निर्णय कोण घेतो, अशी विचारणा केली. त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून, त्यांनीही काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलवावी, अशी मागणी केली आहे. गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल दोघेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, ते त्या २३ नेत्यांपैकी आहेत, ज्यांनी गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांना पत्र लिहीत काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली होती. या नेत्यांच्या गटाला जी-२३ असेही संबोधले जाते.