NandedNewsUpdate : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंगळवारपासून निवडणुकीसंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू असणार आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या आकस्मिक निधनानंतर देगलूर बिलोली मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. ३० ऑक्टोबर रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी कॉग्रेस आणि भाजपने कंबर कसली आहे. काँग्रेसकडून जितेश अंतपुरकर यांच्या नावाची चर्चा आहे, तर भाजपाकडून मारोती वाडेकर यांचे नाव सध्या तरी आघाडीवर आहे.दरम्यान दुसरीकडे, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे देखील मतदारसंघात निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. यामुळे देगलूर बिलोली मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेचा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने लढत तिरंगी होणार आहे. दरम्यान, सभा आणि रॅली काढण्यासाठी प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.