PanjabNewsUpdate : मोठी बातमी : पंजाबच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट , सिद्धू यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची राजीनामा

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करूनही पंजाब काँग्रेसमधील राजकीय वाद थांबायला तयार नाहीत असे दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून पंजाबचे नवीन मुख्यमंत्री पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे.दरम्यान सिद्धू यांनी राजीनाम्याचे कारण जरी पत्रात सांगितले नसले तरी नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासोबत सिद्धू यांचं पटत नसल्याचेही वृत्त आहे. मी पंजाबच्या भविष्यासोबत तडजोड करु शकत नाही. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. मात्र, आगामी काळात काँग्रेससाठी काम करतच राहीन असे सिद्धू यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
सोनिया गांधी यांना लिहिलेल्या आपल्या पत्रात सिद्धू यांनी म्हटले आहे कि , ”तडजोडी करण्यापासून माणसाचे चारित्र्य ढासळण्यास सुरूवात होते. मी पंजाबचे भवितव्य व पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यावर तडजोड करणार नाही. त्यामुळे मी पंजाबच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.”
Punjab Congress chief Navjot Singh Sidhu resigns pic.twitter.com/KbDbderXeo
— ANI (@ANI) September 28, 2021
दरम्यान गेल्या काही दिवासांपासून पंजाबमधील राजकीय समीकरणे रोजच बदलताना दिसत आहेत. गेल्या वर्षभरापासून माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने पंजाबमधील राजकीय वाद आता संपल्याचे सांगितले जात होते परंतु हे वाद थांबताना दिसत नाहीत. दरम्यान आज सिद्धू यांच्या राजीनाम्याची कुण कुण लागताच कॅप्टन अमरिंदर सिंग हे आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांना पराकोटीचा विरोध
राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर टीका करण्याचे धोरण अवलंबले आहे. विशेषत: नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. “नवज्योतसिंग हा देशासाठी एक आपत्ती ठरणार आहे. त्यामुळे २०२२मध्ये मी त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवार उभा करीन. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला माझा कायम विरोध असेल”, असे देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले होते.