IndiaNewsUpdate : प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचे निधन

नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या कमला भसीन यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. शनिवारी पहाटेच ३.०० वाजल्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमला भसीन हे भारत तसेच दक्षिण आशियाई देशांत महिला आंदोलनातील एक आघाडीचे नाव होते . महिलावादी आंदोलनाला कमला भसीन यांची कमतरता कायम भासत राहील, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली व्यक्त करण्यात येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या कविता श्रीवास्तव यांनी हि माहिती दिली आहे.
विपरीत परिस्थितीतही त्यांनी आयुष्याचा आनंद साजरा केला. कमला, तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात जिवंत असाल, असं ट्विट करत कविता श्रीवास्तव यांनी कमला भसीन यांना आदरांजली व्यक्त केली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांनीही आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. कमला भसीन यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ‘कमला भसीन अखेरपर्यंत लढल्या, गायन आणि आयुष्याचा आनंद साजरा केला. त्यांची अनुपस्थिती नेहमीच जाणवत राहील. साहसी उपस्थिती, हास्य आणि गीत हाच त्यांचा वारसा आहे’ असे आझमी यांनी म्हटले आहे.
Kamla Bhasin, our dear friend, passed away around 3am today 25th Sept. This is a big setback for the women's movement in India and the South Asian region. She celebrated life whatever the adversity. Kamla you will always live in our hearts. In Sisterhood, which is in deep grief pic.twitter.com/aQA6QidVEl
— Kavita Srivastava (@kavisriv) September 25, 2021
महिलांचा आवाज ठरलेल्या कमला भसीन यांचा जन्म २४ एप्रिल १९४६ मध्ये झाले होता. १९७० पासूनच त्यांनी महिलांसाठी काम सुरू केले होते . लैंगिक भेदभाव, शिक्षण, मानव विकास, मीडिया अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये त्या रमल्या. आपल्या लिखाणाच्या माध्यमातून लैंगिक समानता, महिलावाद आणि पितृसत्तेच्या मुद्द्यांवर त्यांनी आपले विचार मांडले. आजवर त्यांची पुस्तकं इतर अनेक भाषांत अनुवादीत होऊन वाचकांपर्यंत पोहचली आहेत. २००२ साली कमला भसीन यांनी एका ‘संगत’ नावाच्या महिलावादी संघटनेची स्थापना केली होती. या माध्यमातून त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी समाजातील वंचित महिलांसाठी काम केलं. या महिलांपर्यंत पोहचण्यासाठी नाटक, लोकगीते, कला यांसारख्या सोप्या – सरळ माध्यमाचा त्यांनी वापर केला.