MaharashtraCrimeUpdate : अल्पवयीन मुलीवर ३० जणांकडून सामूहिक बलात्कार, २३ जणांना अटक

ठाणे : मुंबईतील अमानुष बलात्काराची घटना ताजी असतानाच आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची भीषण घटना घडली असल्याचे वृत्त आहे. डोंबिवलीच्या भोपर परिसरातील १४ वर्षीय मुलीवर ३० जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या क्रूर घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते . त्यातच पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी आत्तापर्यंत २३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. पीडित मुलीच्या प्रियकराने बलात्कार करतानाचा एका व्हिडिओ काढला होता. या व्हिडियोच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी सामूहिक बलात्काराचे दुष्कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे .
या अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० जणांनी वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेवून सामूहिक बलात्कार केला आहे. नराधमांनी जानेवारी २०२१ पासून २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत पीडितेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने काल रात्री मनपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत २३ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. संबंधित सर्व आरोपींनी पीडितेला डोंबिवली, बदलापूर, मुरबाड, राबळे अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन आरोपी अल्पवयीन आहेत, बाकीचे सर्व आरोपी १८ वर्षांपुढील आहेत. पीडित अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने ८ महिन्यांपूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान आरोपीने बलात्काराचा व्हिडीओही शूट केला होता. याच व्हिडीओच्या आधारे आरोपींनी पीडितेला ब्लॅकमेल करत अत्याचार केले आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
शालिनी ठाकरे यांच्याकडून संताप
दरम्यान राज्यात होत असलेल्या महिलांवरील अत्याचारावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “डोंबिवलीमधील सामूहिक बलात्काराची घटना अंगावर काटा आणणारी आहे. दिल्ली युपीपेक्षा महाराष्ट्राची स्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अजून काय घडणं अपेक्षित आहे?” असा सवाल करत शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.