PanjabNewsUpdate : पत्रकारांसमोर का भावूक झाले मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी ?

चंदिगड : ज्याच्या घरावर छप्परही नव्हते त्या एका सामान्य माणसाला काँग्रेसने मुख्यमंत्री बनवले. राहुल गांधी गरीबांच्या पाठीशी उभे आहेत. राहुल गांधी नेहमी गरीबांबद्दल बोलतात. काँग्रेसने एका सामान्य माणसाला आज मुख्यमंत्री बनवले. मी गरिबांचा प्रतिनिधी आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि संपूर्ण पक्षाचा आभारी आहे. पंजाबच्या हिताचा विचार करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांचा मी प्रतिनिधी आहे, अशा शब्दात पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी यांनी आपल्या भावना व्यक्त करीत काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
Congress MLA Charanjit Singh Channi takes oath as Punjab CM at Raj Bhawan pic.twitter.com/W68LmKIl70
— ANI (@ANI) September 20, 2021
काल विधिमंडळाचे नेते म्हणून राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आज चरणजीत सिंग चन्नी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत यांनी चन्नी यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेस नेते ओ पी सोनी आणि सुखजिंदर एस रंधावा यांनीही त्यांच्या समवेत मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी खासदार राहुल गांधी , पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत आणि पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूही उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान ते बऱ्याचदा भावुक झाले आणि शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणाही केल्या. आपल्या पत्रकार परिषदेची सुरुवात त्यांनी गुरुवाणी आणि गुरु गोविंद सिंग यांचा संदर्भ देत केली.
चन्नी हे चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचणारे चरणजीत सिंह चन्नी हे अनुसूचित जातीतील पहिलेच मुख्यमंत्री ठरत आहेत. तसेच राज्यातील सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री बनण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.
शेतकऱ्यांवर कुठलंही संकट आल्यास मी माझा गळा चिरून ठेवेन…
पत्रकारांशी बोलताना चरणजीत सिंग चन्नी म्हणाले कि , माझ्या वडिलांनी रिक्षा चालवली आहे. मी स्वतः रिक्षा चालवली आहे. मी रिक्षाचालकांचा आणि सामान्यांचा लोकप्रतिनिधी आहे. व्यापाऱ्यांनी माझ्यापासून दूर रहावं. मी फक्त सामान्य माणसाचं नेतृत्व करेन. शेतकरी बुडाला तर भारत बुडेल. शेतकरी आहे म्हणून ग्राहकच शेतकऱ्याकडे येतात. पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी मी सर्वकाही त्याग करण्यास तयार आहे. पंजाबमधील जनतेच्या अपेक्षांनुसार आपल्याला पुढे जायचे आहे. पंजाब हे शेतीप्रधान राज्य आहे आणि शेती, शेतकऱ्यांवर कुठलंही संकट आल्यास मी माझा गळा चिरून ठेवेन, असेही मुख्यमंत्री चन्नी म्हणाले. शेतकरी सुखी होईल तरच पंजाब सुखी होईल. शेतकरी संपला तर मजूर आणि गरीबही संपेल. यामुळे केंद्र सरकारने काळे कृषी कायदे मागे घ्यावेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही करावं लागेल ते आपण करू. आम्ही शेतकऱ्यांना प्रत्येक मार्गाने पाठिंबा देतो .
We will waive water and electricity bills of farmers: Punjab CM Charanjit Singh Channi pic.twitter.com/YVXTMH5MbC
— ANI (@ANI) September 20, 2021
शेतकऱ्यांना वीज बिल माफी
विजेच्या मुद्द्यावर बोलताना चन्नी यांनी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा यांनी यावेळी केली. थकबाकीमुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले असेल तर पुन्हा जोडले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. त्यांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील. फक्त थोडा वेळ द्या. असे आवाहन मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी यावेळी केले.
काँग्रेस अंतर्गत नेत्यांची धुसफूस चालूच
दरम्यान काँग्रेस नेतृत्वाकडून पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची पेच कसाबसा सोडवण्यात आला असला तरी पंजाब काँग्रेसमधील धुसपूस अद्याप संपलेली नाही असे चित्र आहे. काँग्रेस नेतृत्वाकडून मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात आघाडीवर असलेलं आपले नाव डावलून काँग्रेस नेतृत्वाने चन्नी यांना दिलेल्या संधीमुळे उघड नसली तरी छुपी नाराजी सुनील जाखड यांनी व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, असे वक्तव्य हरीश रावत यांनी केल्यानंतर, ‘हरीश रावत यांचं हे वक्तव्य म्हणजे नव्या मुख्यमंत्र्यांचे अधिकार क्षेत्र कमी करण्यासारखे ‘ असल्याचे वक्तव्य सुनील जाखड यांनी केले आहे. ‘चरणजीत सिंह चन्नी यांच्या शपथविधीच्या दिवशीच हरीश रावत यांनी केलेलं वक्तव्य धक्कादायक आहे. हे मुख्यमंत्र्यांची ताकद कमी करण्यासारखं आहे आणि सोबतच यामुळे कुणाच्या नियुक्तीवरही प्रश्नचिही उभं करतं’, असे सुनील जाखड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे सुनील जाखड यांचा भाचा अजयवीर जाखड यांनी पंजाब शेतकरी आयोगाच्या पदाचा आपला राजीनामा सोपवला आहे.