MumbaiNewsUpdate : गणेशाला निरोप देताना ५ मुले बुडाली , दोघांना वाचविण्यात यश , तिघांचा शोध जारी…

मुंबई : ‘ गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत श्री गणेशाला आज सर्वत्र भक्तिभावाने निरोप देण्यात आला. कोणत्याही प्रचंड गर्दीविना ठिकठिकाणी गणेश विसर्जन शांततेत पार पडले मात्र गणेश विसर्जनच्यावेळी वर्सोवाच्या समुद्रात ५ मुले बुडाल्याची दुर्घटना घडली आहे.यापैकी २ जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले असून ३ बेपत्ता आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनादरम्यान वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विसर्जन करत असताना ५ जण बुडाले. मात्र स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेऊन २ मुलांना वाचवले असून ३ जण बेपत्ता झाले आहेत. जीवरक्षक, आणि अग्निशमन दलाच्या साहाय्याने या बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात असून त्यासाठी नौदलाची सुद्धा मदत मागण्यात आली आहे.
पुण्यातील विसर्जन शांततेत
याशिवाय पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचं विसर्जन शांततेत पार पडले आहे. मात्र ठिकठिकाणी गणेश विसर्जन अजूनही सुरूच आहे. पिंपर चिंचवडमध्ये इंद्रायणी नदी पात्रात सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन केले जात आहे.
दरम्यान मोशी आळंदी रोडवर इंद्रायणी नदी पात्रात गणेश विसर्जन सुरू असताना अचानक दोन मुले बुडाल्याची घटना घडली आहे. दत्ता ठोंबरे (वय २०) आणि प्रज्वल काळे (१८) अशी बुडालेल्या तरुणांची नाव आहे. हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक होते. घटनास्थळी अग्निशमन विभागाने धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे. एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे.
याशिवाय अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील शिक्षक हमीद पठाण यांचा १७ वर्षीय मुलगा अरमान पठाण याचा बासलापूर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोहतांना गाळात पाय फसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात काका आणि इतर दोन भाऊही गाळात फसले होते. पण, वेळीच गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून इतरांचे प्राण वाचवले.