MaharashtraPoliticalUpdate : राजीव यांच्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसकडून या महिला नेत्याला संधी

मुंबई : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित झाली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अखेर उमेदवार ठरला आहे. रजनी पाटील यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केला आहे. दरम्यान राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांचे नाव असून आता या यादीत प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश या राज्यातील एकुण सहा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. तर मध्यप्रदेशातील एका जागेचा, पश्चिम बंगालमधील एका जागेचा, तमिळनाडूमधील दोन रिक्त जागांचा समावेश आहे. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच दिवशी निकाल सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान राजीव सातव यांच्या जागेवर काँग्रेस पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याबाबत सुरु असलेल्या चर्चेला काँग्रेसकडून पूर्णविराम देण्यात आला असून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचे पत्रक काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. याआधी काँग्रेसकडून मुकूल वासनिक, प्रज्ञा सातव, मिलिंद देवरा, राजीव शुक्ला यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अखेरील रजनी पाटील यांची निवड झाली आहे. तर, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना राज्यसभेवर उमेदवारी न देता कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून २०२४ च्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी. त्यामुळे आता रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे प्रज्ञा सातव यांचीही आमदारकी निश्चित मानली जात आहे.