MaharashtraNewsUpdate : अनिल देशमुख यांच्याकडील १७ कोटींचा हिशेब लागेना , आयकर खात्याकडून दोन दिवस झाड झडती

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आयकर विभागाच्या कारवाईदरम्यान आढळलेली कागदपत्रे, पावत्या यांच्या आधारे जवळपास सतरा कोटींचा अधिकृत लेखी हिशेब नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे देशमुख यांच्या अडचणींत आणखी भर पडली असल्याचे वृत्त आहे.
उपलब्ध माहितीनुसार प्राप्तीकर विभागाने शुक्रवार आणि रविवार असे दोन दिवस देशमुख यांचे काटोल येथील निवासस्थान, व्हीआयपी मार्गावरील निवासस्थान, एनआयटी कॉलेज, रामदासपेठेतील मिडास हाइट येथील कॉलेजचे कार्यालय येथे छापे टाकले. या कारवाईदरम्यान सर्व बँक खाती, बँक लॉकर सील करण्यात आले होते. कारवाईदरम्यान महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले. यामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी एका दलालाला देण्यात आलेले कमिशन, कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन, बोगस डोनेशन रीसिप्ट, बेहिशेबी खर्च आदींशी संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे.
दरम्यान नागपूरसह, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे ही कारवाई झाली. ज्यात एकूण तीस जागी शोध मोहीम राबविण्यात आले. कारवाईदरम्यान देशमुख यांच्या शिक्षण संस्थेने बेहिशेबी व्यवहार केल्याचे आढळले. दिल्ली स्थित एका कंपनीच्या सहाय्याने जवळपास चार कोटींचे बोगस डोनेशन संस्थेला मिळाले. त्याशिवाय संस्थेच्या तीन महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले वेतन रोख स्वरूपात परत घेण्यात आले आहे. ही रक्कम सुमारे बारा कोटीइतकी आहे. महाविद्यालयात प्रवेशासाठी दलालांना कमिशन दिले जायचे. कमिशनपोटी साधरणपणे ८७ लाख रुपये देण्यात आल्याचे दिसून आले.