PanjabPoliticalUpdate : पंजाबमधील राजकीय घडामोडी : का द्यावा लागला कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा ?

चंडीगड : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू आणि मावळते मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात राजकीय युद्ध सुरु होते. या वादात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांच्यातील वाद काही थांबला नाही अखेर पक्ष नेतृत्वाने कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निरोप दिला आणि त्यानुसार आजच कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यपालांची भेट घेऊन पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपला राजीनामा दिला. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि या वादाचे सूत्रधार नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह माजी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांची नावे स्पर्धेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या बाबत कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा मुलगा रनिंदर सिंह यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. सायंकाळी ४.३० वाजल्याच्या सुमारास राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केल्यानंतर मीडियाशी बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी , ‘पक्षात अपमानजनक वागणूक देण्यात आल्याची भावना’ व्यक्त केली. ते म्हणाले कि , ‘आज सकाळीच माझा निर्णय झाला होता. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून संवाद साधून माझा हा निर्णय त्यांना कळवला होता. मला अपमानजनक वागणूक देण्यात आली. माझ्या नेतृत्वावर शंका उपस्थित करण्यात आली. दोन महिन्यांत तीन वेळा संवाद न साधता नेतृत्वाकडून थेट विधिमंडळ दलाची बैठक बोलावण्यात आली. आता मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांच्यावर सोपवावी’, असे सांगून मी राजीनामा दिला. ‘राजीनाम्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाचा होता. त्याप्रमाणे मी निर्णय घेतला . आता दुसऱ्या पक्षात जाणार कि , काँग्रेसमध्येच राहणार ? या विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि , मी अद्यापही काँग्रेस पक्षात आहे. साडे नऊ वर्ष मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हाताळली. समर्थकांशी चर्चा केल्यानंतरच पुढचा निर्णय घेईल. माझ्यासमोर अनेक मार्ग खुले आहेत’.
I feel humiliated by the way talks transpired. I spoke with the Congress president this morning, told them that I will be resigning today… This is the third time in recent months in meeting MLAs… which is why I decided to quit..:Amarinder Singh after resigning as Punjab CM pic.twitter.com/rFojYU51or
— ANI (@ANI) September 18, 2021
आज नेमकं काय झालं ?
सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची गच्छंती निश्चित होती कारण काँग्रेस नेतृत्वाकडून अमरिंदर यांना राजीनामा देण्यात आदेश देण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीअगोदरच काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरु आहेत. काँग्रेस विधिमंडळ दलाच्या बैठकीपूर्वी नाराज अमरिंदर सिंह यांनी फोनवरून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केली. आपल्याशी चर्चेविना थेट विधिमंडळ दलाची बैठक बोलावणं हा आपला अपमान असल्याची कॅप्टन अमरिंदर सिंह यांची भावना त्यांनी व्यक्त केली. यामुळेच, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आज मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यासोबतच काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा निर्णयही घेतला असून त्याची औपचारिक घोषणाच बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
I am in the Congress party, will consult with my supporters and decide the future course of action: Amarinder Singh after resigning as Punjab CM pic.twitter.com/8hkJ2llT1m
— ANI (@ANI) September 18, 2021
६० आमदारांनी पक्ष सोडून’आप’मध्ये दाखल होण्याची दिली होती धमकी !
दरम्यान, काँग्रेस नेतृत्वाच्या आदेशानंतर चंदीगडमध्ये काँग्रेस विधिमंडळ दलाची बैठक चालू असून पक्षाचे ज्येष्ठ नेते हरीश रावत पक्षाच्या दोन पर्यवेक्षकांसहीतहि बैठक घेत आहेत. पक्षातील अनेक आमदारांनी कॅप्टन अमरिंदर यांची साथ सोडल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार सुरजीत धीमान यांनी तर २०२२ च्या निवडणुका कॅप्टन अमरिंदर यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या तर मी निवडणूक लढणार नाही’, असा इशाराही दिला होता.
दुसरीकडे, काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीपूर्वी माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सुनील जाखड यांच्या एका ट्विटनं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. ‘राहुल गांधी यांनी पंजाबमधल्या वादावर समाधानकारक मार्ग काढला आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते खुश आहेत’ असं ट्विट जाखड यांनी केले आहे. कॅप्टनविरोधी ६० आमदारांनी पक्ष सोडून ‘आप’मध्ये दाखल होण्याची धमकी दिल्यानंतर पक्ष नेतृत्वाकडून अमरिंदर सिंह यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.