WorldNewsUpdate : दिलासादायक बातमी : जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट , ज्येष्ठ नागरिकांना मात्र मोठ्या प्रमाणावर लागण

जिनिव्हा: जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या ताज्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात जगभरात नोंदवण्यात आलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात पहिल्यांदा झालेली ही मोठी घट आहे. जगातील सर्वच भागांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. त्याशिवाय कोरोना बळींच्या संख्येतही घट झाली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, वयस्करांच्या तुलनेत कोरोना विषाणूची लागण मुलांना आणि युवकांना कमी प्रमाणात होत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्याचेही समोर येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या दक्षिण-पूर्व आशिया भागात झाली आहे. तर, आफ्रिकामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू दरात सात टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, अमेरिका, ब्रिटन, भारत, इराण आणि तुर्कीमध्येे सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. वेगाने फैलावणाऱ्या डेल्टा वेरिएंटचा संसर्ग १८० देशांमध्ये झाला आहे.
दरम्यान फ्रान्समध्ये सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाविरोधी लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, त्यांना कामावर रुजू होण्यास मनाई करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये जवळपास तीन लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी करोना लस घेतली नाही.