IndiaNewsUpdate : मेरे देश मे …. इथे ओशाळली मानवता , जेंव्हा तिच्या बाळाने तिच्या कुशीतच जीव सोडला !!

भिलवाडा : अशा घटना तर नेहमीच घडतात , मग नंदुरबारमधील आपल्या पत्नीचा जीव वाचावा म्हणून रस्त्याअभावी पत्नीला आपल्या खांदयावर घेऊन जणारा पती असो कि आपल्या आजारी बाळाला वाचवण्यासाठी आपल्या कवेत घेऊन निघालेली आई असो … पण यांच्या दुःखाला पाहून , वाचून विकासाच्या गप्पा आणि थापा मारणाऱ्या सरकारला काहीच वाटत नाही. अशाच दुःखद मालिकेत राजस्थानातील भिलवाडा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
या बातमीतील मजूर म्हणून काम करणारी एक आई आपल्या तीन वर्षांच्या निष्पापांच्या उपचारासाठी वेतनाची थकबाकी मिळेल या आशेने भिलवाडा येथे गेली, पण पैशाअभावी डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकली नाही. हि असहाय्य आईची नजर बस स्टँडवर बसून ठेकेदाराला शोधत राहिली आणि येतो म्हणून न आलेल्या ठेकेदाराची वाट पाहता पाहता तिच्या काळजाच्या तुकड्याने आईच्या कुशीतच अखेरचा श्वास घेतला. ही महिला पाली जिल्ह्यातील रहिवासी आहे. आजतक ऑनलाईन या वेबपोर्टलने हि बातमी दिली आहे.
मुलासह बदनोरला येण्यास सांगितले…
या माहितीनुसार, पाली जिल्ह्यातील जोजावर येथील आशा रावत आपल्या तीन वर्षांच्या आजारी मुलासह भिलवाडा जिल्ह्यातील बदनोर शहरात आल्या होत्या. आशा गुजरातच्या जामनगरमध्ये भंवर सिंह या विहीर खोदणाऱ्याकडे मजूर म्हणून काम करतात. ठेकेदार भंवर सिंह हा बडनोरजवळील मोगर गावाचा रहिवासी आहे. आशाच्या मुलाची तब्येत बिघडल्यावर तिने ठेकेदार भंवर सिंह यांना फोन करून वेतनाची थकबाकी देण्याची मागणी केली. त्यावर कंत्राटदार भंवर यांनी त्यांना आपल्या मुलासह बदनोरला येण्यास सांगितले, असे या महिलेचे म्हणणे आहे.
कंत्राटदार भंवर सिंह यांच्या आश्वासनावर कोणाकडून तीनशे रुपये उसने घेतल्यानंतर आशा तिच्या आजारी मुलासह बदनोरला आल्याचे सांगितले जाते. पैशाअभावी ती एकटी आली आणि तिचा पती गोमसिंह रावत येऊ शकला नाही कारण तिच्याकडे फक्त तीनशे रुपये होते, जे एका माणसाचे भाडे होते. आशाला आशा होती की तिला कंत्राटदार भंवर सिंग कडून तिचे योग्य वेतन मिळेल आणि ती एका चांगल्या डॉक्टरांनी तिच्या आजारी मुलावर औषधोपचार करून तिच्या गावी परत येईल, पण कंत्राटदाराने पैसे दिले नाहीत असा तिचा आरोप आहे.
अखेर तिचा मुलगा तिच्या मांडीवरच मरण पावला…
एकीकडे हि मजबूर आई आजारी बाळाला सावरत वारंवार कंत्राटदाराला फोन करत राहिली, त्यावर तो ठेकेदार ‘पैसे घेऊन लवकर पोहोचतो ‘ एवढेच सांगत राहिला तर दुसरीकडे मुलाची प्रकृती खालावत राहिली आणि आईची नजर ठेकेदाराला शोधत राहिली पण ठेकेदार तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही, अखेर तिच्या बाळाने तिच्या कुशीतच जीव सोडला. आता तर या आईकडे गावाकडे परतण्यासाठी भाड्याचे पैसेही शिल्लक नव्हते जेणेकरून ती आपल्या घरी परत जाऊ शकेल. मुलांना हातात धरून ती रडत राहिली.
दरम्यान गावातील लोकांना जेव्हा महिलेच्या वेदना कळल्या तेव्हा त्यांनी पोलिसांनाही कळवले, परंतु पोलिसांनी घटनास्थळी येणे आवश्यक मानले नाही. उलट पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद मीणा यांनी गावकऱ्यांना सांगितले की, हे काम पोलिसांचे नाही, पैसे गोळा करा आणि महिलेला गावात घेऊन जा.या नंतर गोविंद पुरी, इद्रिश, भागचंद सोनी, सुखदेव माळी, इस्लाम मोहम्मद या बदनोर गावातील तरुणांनी वर्गणी जमा करून तीन हजार रुपयांची व्यवस्था केली आणि महिलेचा आणि तिच्या मुलाचा मृतदेह पाली जिल्ह्यातील तिच्या जोजावर या गावात वाहनात पाठवण्याची व्यवस्था केली.