CoronaVaccineUpdate : कोरोना लस आणि अँटिबॉडीज , बुस्टरची आवश्यकता आहे की नाही ? यावर चालू आहे अभ्यास !!

नवी दिल्ली : लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर काही जणांच्या शरीरात करोनाविरुद्धच्या अँटिबॉडीज कमी झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर चार महिन्यांमध्ये हे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. या अभ्यासासाठी भारतातल्या ६१४ संपूर्ण लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. या अभ्यासामुळे सरकारला बुस्टर डोस द्यावा की नाही याबाबतचा निर्णय घेण्यास मदत होणार आहे.
याविषयी झी न्यूजने दिलेल्या वृत्तात असे नमूद करण्यात आले आहे की, अँटीबॉडीज कमी होत आहेत याचा अर्थ असा नाही की लसीकरण झालेल्या लोकांचा रोगाचा सामना करण्याची त्यांची क्षमता कमी होते. कारण शरीरातल्या स्मृती पेशी अजूनही भरीव संरक्षण देऊ शकतात. भुवनेश्वरच्या पूर्वेकडील शहरामध्ये असलेल्या प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्राच्या संघमित्रा पाटीने मंगळवारी रॉयटर्सला सांगितले की, “बुस्टरची आवश्यकता आहे की नाही हे आम्ही अजून सहा महिन्यांनी अधिक स्पष्टपणे सांगू शकू आणि आम्ही देशभरातली माहिती मिळावी यासाठी देशभरात अशा पद्धतीचा अभ्यास होईल असा आग्रह धरु.”
ब्रिटिश संशोधकांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की फायझर/बायोटेक आणि अॅस्ट्राझेनेका लसीच्या दोन डोसद्वारे देण्यात येणारे संरक्षण सहा महिन्यांत कमकुवत होऊ लागते. आत्ता करण्यात आलेल्या या अभ्यासात देशातील पहिल्या दोन कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचा समावेश आहे. आरोग्य अधिकारी म्हणतात की ते बुस्टर डोससंदर्भात आत्ता विचार सुरू असला तरी प्रौढांचं पूर्णपणे लसीकरण करणे हे प्राधान्य आहे. ६०% पेक्षा जास्त लोकांना किमान एक डोस आणि १९% लोकांना आवश्यक दोन डोस मिळाले आहेत.