SakinakaRapeCaseUpdate : साकीनाका बलात्कार प्रकरणात पोलिसांना मिळाले महत्वाचे पुरावे , आरोपीविरुद्ध अॅट्रॉसिटीचाही गुन्हा : हेमंत नगराळे

मुंबई : मुंबईला हादरवून सोडणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या अटकेनंतर महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून घटनेची माहिती मिळताच अवघ्या दहा मिनिटांत आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत या प्रकरणाच्या तपासाची माहिती दिली. नागराळे यांनी सांगितले कि , आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.
१० सप्टेंबर रोजी मुंबईतील साकीनाका येथे एका ३२ वर्षीय महिलेवर टेम्पोत बलात्कार करून तिला अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पीडितेवर राजावाडी रुग्णालयात उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी सुरू असलेल्या पोलीस तपासाबाबत हेमंत नगराळे यांनी आज सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले कि , आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे हाती लागले आहेत. गुन्ह्याचा घटनाक्रमही स्पष्ट झाला आहे. आमचा तपास येत्या महिनाभरात किंवा त्यापूर्वीच पूर्ण होईल. आरोपीचे महाराष्ट्रात अद्याप कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड सापडलेले नाही. आता आम्ही उत्तर प्रदेशमध्ये आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास करत आहोत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक तसेच अन्य अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत जाहीर केली आहे, अशी माहितीही आयुक्तांनी दिली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांशी तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा झाल्याचे नगराळे म्हणाले.
दरम्यान साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर ‘प्रत्येक घटनेच्या ठिकाणी पोलीस हजर राहू शकत नाहीत’ असे विधान हेमंत नगराळे यांनी केले होते. त्यावर बरीच टीका झाली होती. त्याबाबत बोलताना ते म्हणाले कि, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. पोलीस प्रत्येक घटनेच्या ठिकाणी हजर असू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे पण पोलीस तिथपर्यंत पोहचणार हे मात्र निश्चित आणि म्हणूनच आम्ही १० मिनिटांत तिथे पोहचू शकलो व आरोपीला पकडू शकलो, असे नगराळे म्हणाले. मी माझ्या विधानावर ठाम असल्याचेही ते म्हणाले.