MaharashtraNewsUpdate : अनिल देशमुख यांना हजर करण्यासाठी ईडी घेतेय सीबीआयची मदत

मुंबई : ईडीने वारंवार समन्स देऊनही अनिल देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहत नाहीत. त्यामुळे ईडी आणि सीबीआय मिळून देशमुखांना शोधण्यासाठी राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. याआधीही, ईडीने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित नागपूर आणि मुंबईच्या १३-१४ ठिकाणी छापे टाकले होते. अंमलबजावणी संचालनालय-ईडीने आता महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई अधिक तीव्र केली आहे.
सध्या अनिल देशमुख हे १०० कोटी वसुली आणि मनी लाँडरिंग प्रकरणात आरोपांचा सामना करावा लागत आहे. ईडीने अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे मदत मागितली आहे. अनिल देशमुख यांना वारंवार समन्स देऊनही ईडी चौकशीसाठी हजर न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याआधीही देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआय निरीक्षक अभिषेक तिवारी यांना न्यायालयाने दोन दिवसांची सीबीआय कोठडी दिली होती. देशमुख यांच्याविरुद्धच्या तपासाचा अहवाल लीक केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्या लीक झालेल्या अहवालाच्या आधारे अनिल देशमुख निर्दोष असल्याची बातमी पसरवली गेली होती. सीबीआयने या दोघांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. तिवारी देशमुखांचे वकील डागा यांच्या संपर्कात होते आणि त्यांना सीबीआय अहवालाशी संबंधित माहिती लीक करत होते.