IndiaNewsUpdate : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

बंगळुरू : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन झाले असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील मंगळुरूमध्ये ऑस्कर फर्नांडिस यांनी शेवटचा श्वास घेतला. ८० वर्षांचे ऑस्कर फर्नांडिस काही काळापासून आजारी होते. आणि काही आठवड्यांपूर्वी त्यांना मंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या जुलैमध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि मुलगी आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या विश्वासू नेत्यांची ऑस्कर फर्नांडिस एक होते. कुठल्याही स्थितीवर तोडगा किंवा मार्ग काढणारे काँग्रेसचे नेते अशी त्यांची ओळख होती. त्यांनी ईशान्य भारतातील बंडखोरांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यास मदत केली. याशिवाय सरकार आणि पक्षातील कुठलाही वाद असो, तो सोडवण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली. त्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरेची जाण होती. ते कुच्चीपुडी नृत्याचे प्रशिक्षित डान्सर होते. ‘ब्रदर ऑस्कर’ या नावाने ते जनतेत लोकप्रिय होते. त्यांनी ईशान्येतील बंडखोर संघटना NSCN च्या नेत्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात भूमिका बजावली होती. मंगळुरूतील डॉक्टरांनी जुलैमध्ये त्यांच्या मेंदुतील रक्ताच्या गाठी हटवण्यासाठी यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. मेंदूविकार तज्ज्ञ दिवाकर राव आणि सुनील शेट्टी यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. यानंतर त्यांच्यावर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्याचवेळी त्यांच्यावर डायलेसिसही सुरू होता.
ऑस्कर फर्नांडिस हे माजी केंद्रीय मंत्री होते. परिवहन, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे मंत्री होते. काँग्रेसच्या अखिल भारतीय निवडणूक समिचीचे अध्यक्ष होते. तसंच काँग्रेसचे माजी सरचिटणीसही होते. ऑस्कर फर्नांडिस हे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचे संसदीय सचिव होते. कर्नाटकच्या उडुपी लोकसभा मतदासंघातून ते १९८० निवडून गेले होते. एवढचं नव्हे तर ते या मतदारसंघातून एक दोन वेळा नव्हे तर तब्बल ५ वेळा निवडून येत खासदार झाले होते. १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले. ऑस्कर फर्नांडिस यांचे वडील हे शाळेत शिक्षक होते. फर्नांडिस हे दोन टर्म कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले. काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्येही ते लोकप्रिय नेते होते.