MaharashtraPoliticalUpdate : बहुचर्चित लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर हातात घेणार राष्ट्रवादीचा झेंडा !!

मुंबई : प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश आता निश्चित झाला असून मुंबईत १६ सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. आपल्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाची माहिती त्यांनी स्वतः एका व्हिडिओद्वारे दिली आहे.
दरम्यान सुरेखा पुणेकर यांनी गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा प्रकट केली होती मात्र कुठल्याही पक्षाचे तिकीट मिळवणे त्यांना शक्य झाले नाही. आता मात्र त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हातात धरण्याचे निश्चित केले आहे. राज्यपालांकडे पाठवलेल्या नावांपैकी राष्ट्रवादीच्या कोट्यातून एखादे नाव कमी झल्यास त्यांची वर्णी त्यात लागू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंत कलेची सेवा केली आणि जनसेवा करण्यासाठी राजकारणात यायचंय. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत असे सुरेखा पुणेकर यांनी म्हटले आहे.
सुरेख पुणेकर यांच्याविषयी थोडक्यात…
राज्यातील एक प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी म्हणून सुरेखा पुणेकर महाराष्ट्राला परिचित आहे. पारंपरिक लावणी या लोकनृत्याची परंपरा सर्वदूर पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. सुरेखा पुणेकर यांनी वयाच्या ८ व्या वर्षांपासून लावणी आत्मसात केल्यांनतर त्यांचे या कला क्षेत्रात मोठे नाव आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसकडून तिकीट मिळेल अशी चर्चा होती परंतु त्यांना काँग्रेसकडून तिकीट मिळाले नव्हते. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील पोट निवडणूक लढविण्याचाही त्यांचा मनोदय होता परंतु तसे झाले नाही. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेखा पुणेकर यांना महाराष्ट्रात चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. त्यामुळे त्यांना बिग बॉसच्या स्पर्धक म्हणूनही त्यांना संधी मिळाली होती
त्यांनी म्हटले आहे कि , “चित्रपट, कला, साहित्य, संस्कृतिक विभाग मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १६ सप्टेंबरला मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. आतापर्यंत मी कलेची सेवा केली आता मला राजकारणात जनतेची सेवा करायची आहे, महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. १६ सप्टेंबरला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे,” असं सुरेखा पुणेकर यांनी म्हटलं आहे. बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या दुसरा सिझनच्या दुसऱ्या भागामध्ये सुरेखा पुणेकर सहभागी झाल्या होत्या.