MumbaiNewsUpdate : धक्कादायक : क्रूर बलात्कार प्रकरणातील “ती ” पीडित वाचू शकली नाही , गुन्हेगाराला कठोर शिक्षा : मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर एक टेम्पोत महिलेवर बलात्कार झालेल्या बलात्कारानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी मोहन चौहान याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली.
पोलिसांनी सांगितले की, ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या शेजारील कंपनीच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करुन सर्वप्रथम घटनेची माहिती दिली. रात्री ३.२० मिनिटांनी कंट्रोल रूमला फोन आला आणि १० मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडितेला तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
जबाब आम्हाला घेता आला नाही
सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्या कपड्यांवर रस्ताचे डाग आढळून आले आहेत. आरोपी मोहन चौहान याला अटक करण्यात आली आहे. २१ सप्टेंबरपर्यंत त्याची पोलीस कोठडी मिळाली आहे. मोहन चौहान हा उत्तरप्रदेशच्या जौनपूरचा रहिवासी आहे. या संपूर्ण प्रकऱणाचा तपास पोलीस अधिकारी ज्योत्स्ना रासम यांच्याकडे देण्यात आली आहे. लवकरच या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात येईल. पीडित महिलेच्या मृत्यूनंतर आरोपीच्या विरोधात बलात्कारासोबतच हत्येचाही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालणार आहे. पीडित महिला बेशुद्धावस्थेत असल्याने तिचा जबाब आम्हाला घेता आला नाही.
गुन्हेगाराला कठोर शिक्षा : मुख्यमंत्री
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले .
सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू : गृहमंत्री
दरम्यान याबाबत बोलताना गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे कि , साकीनाका येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू असून यात जो कुणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. मुख्य आरोपी पकडला असून त्याच्या कडून माहिती काढून घेऊन त्याच्यावर ही कठोर कारवाई केली जाईल. महिलांच्या बाबतीत लवकरच शक्ती ऍक्ट तयार करण्यात येईल, त्याची प्रोसेस सुरू आहे.
मुंबईच्या लौकिकाला धक्का : देवेंद्र फडणवीस
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि, साकीनाका येथे घडलेला एकूण प्रकार आणि त्यानंतर त्या निर्भयाचा मृत्यू हा मन सुन्न करणारा आहे, चटका लावून जाणारा आहे. गेल्या महिन्याभरात ज्या प्रकारे बलात्काराच्या घटना होत आहेत, कुठेतरी याकडे लक्ष घालण्याच्या आवश्यकता आहे. साकीनाकाचं प्रकरण, अमरावतीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार, पुण्यात तीन घटना घडल्या आहेत. पालघरमध्ये घटना घडल्या आहेत अतिशय भयानक अशा या घटना आहेत. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईत महिला, मुलींना रात्री फिरण्या करता कधी अडचण येत नाही पण अशा प्रकारच्या घटना घडल्या जर घडल्या तर एकप्रकारे मुंबईच्या लौकिकाला धक्का पोहोचतो.
आमची मागणी आहे की, या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत सर्व आरोपी आहेत अशा सर्वांना अटक करावी. तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण न्यावं आणि आरोपींना शिक्षा व्हावी. अशा नराधमांना फाशीच झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी चीफ जस्टीस ऑफ बॉम्बे हायकोर्टाची भेट घ्यावी आणि त्यांना विनंती करुन हा खटला लवकर चालवून संपला पाहिजे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. महिला आयोगाच्या संदर्भात अनेकवेळा सरकारने आश्वासने दिली आहेत. न्यायालयाने देखील सरकारला सूचना केल्या आहेत पण सरकारला फुरसतच नाहीये की महिला आयोगाला ते अध्यक्ष देतील असेही फडणवीसांनी म्हटलं आहे.
साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली
माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही
पण
या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून १ नंबर
लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना
नाही वाचवू शकलो तुला— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) September 11, 2021
चित्रा वाघ यांना अश्रू अनावर
या पीडितेच्या मृत्यूनंतर भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांना अश्रू अनावर झाले. अक्षरशः त्या ढसाढसा रडल्या. पीडित महिलेची विचारपूस करण्यासाठी चित्रा वाघ जात होत्या. त्यांनी तशी माहिती ट्विट करुन दिली होती. मात्र त्या जाण्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला.मी आता निशब्द झाले असून माझ्याकडे यावर बोलायला काही शब्द नाहीत. ज्या पद्धतीने एका महिलेवर अत्याचार करण्यात आले तो राक्षसी होता. मी डॉक्टरांसोबत माझे बोलणे झाले. मी पीडितेला त्या ठिकाणी बघून आले. अक्षरश: तिचे आतडे कापले गेले. तसंच तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला. ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार सुरु आहेत. ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आता आमचे शब्द संपले असून राज्यातल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, असे चित्रा वाघ म्हणाल्यात.