MaharashtraNewsUpdate : वादग्रस्त केतकी चितळेला कधीही होऊ शकते अटक , आंबेडकरी अनुयायांवर केलेली टीका भोवणार

ठाणे : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या केतकी चितळेला भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांच्या संदर्भात अवमानास्पद उद्गार काढल्याच्या प्रकरणात ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून आता तिच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान तिने शिवाजी महाराजांचाही तिने एकेरी उल्लेख केल्यामुळे तिच्यावर टीकेचा भडीमार झाला होता.
गेल्यावर्षी केतकीने १ मार्च २०२० रोजी फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट टाकली होती. त्यात तिने म्हटले होते कि , “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्याच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” . त्यानंतर तिच्या या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
“महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते मुंबई दर्शनासाठी येतात, या त्यांच्या वक्तव्यावरून हा समाज फुकटा आहे आणि त्या महामानवाचा आदर करत नाहीत हे स्पष्ट होत आहे,” या केतकीच्या वक्तव्यावर आक्षेप घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीच्या वक्तव्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून तिच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करून आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वकील स्वप्नील जगताप यांच्या तक्रारीनंतर केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता ठाणे कोर्टाने तिचा अटकपूर्ण जामीन फेटाळला आहे. त्यामुळे केतकीला अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवाजी महाराजांचाही एकेरी उल्लेख
दरम्यान २०२० मध्येच केतकीने एका पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा एकेरी उल्लेख करीत म्हटले होते कि ,
“शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा ! सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात.”
अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!!
सुधारणा करा बाळांनो, शिका.
या पोस्टवरूनही बराच वाद निर्माण झाल्याने शिवप्रेमी नेटकऱ्यांनी तिचे चांगलेच कान उपटले होते. परंतु त्यानंतरही तिचे असे वादग्रस्त पोस्ट करणे थांबले नाही. सिने -दिग्दर्शक , निर्माते महेश टिळेकर यांनीही तिला या विषयावरून जबाब विचारला होता.