MaharashtraRainUpdate : पुराच्या पाण्यात एका महिलेसह तिघे जण वाहून गेले

बुलडाणा : राज्यात पावसाचा कहर चालूच असून बुलडाणा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असून पुराच्या पाण्यात तिघे जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.
बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड येथील युवक आदित्य संतोष गवई हा नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. तर सिंदखेडराजा येथील मंगला शिंगणे ह्या देखील गावानजीक आलेल्या नाल्याच्या पुरात वाहून गेल्या. यासोबतच निमगाव येथील ओम गव्हाळे हा विद्यार्थी देखील पूर्णा नदी पात्रात वाहून गेला. त्यातील आदित्य गवई यांचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध सुरू आहे.
गेल्या २४ तासापासून बुलडाणा जिल्ह्यात पावसाने जणू काही मुक्कामच ठोकला आहे जिल्ह्यातील १३ ही तालुक्यांत पावसाने हाहाकार माजविला असून छोटे मोठे प्रकल्प भरले आहेत. तर नदी नाल्यांना महापूर आला आहे. जिल्ह्याची पावसाची परिस्थिती बघता ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा आणि धामणगाव बडे या गावात तर गावाला जोडणारा रस्ता जलमय झाला. तर काहींच्या घरात देखील पाणी शिरले. तसेच अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे कधी न पहावयास मिळणार पाऊस यावेळी बुलडाणा जिल्ह्यात दिसून आला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाचा तैमान सुरूच आहे.