WorldNewsUpdate : तालिबानकडून सरकार बनविण्याच्या हालचाली , या पाच देशांना निमंत्रण

काबुल : तालिबानने अफगाणिस्तानातील सर्व प्रांतांवर ताबा मिळवल्यानंतर देशात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून सरकार स्थापनेच्या कार्यक्रमासाठी तालिबानने चीन, पाकिस्तान, रशिया, इराण, कतार आणि टर्कीला निमंत्रण पाठवले आहे. या देशांनी यापूर्वीच तालिबान संघटनेशी संपर्क साधला आहे. अफगाणिस्तानात असलेल्या चीन, रशिया. टर्की आणि पाकिस्तानच्या दूतावासांनी आपले दूतावास काबूलमध्ये कायम ठेवले आहेत. मात्र तालिबानने भारताशी कोणताही अधिकृत संपर्क साधलेला नाही.
नव्या सरकारबद्दल माहिती देताना तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी पुढच्या आठवड्यात सरकार स्थापन केले जाणार आहे. कतार, टर्की आणि संयुक्त अरब अमिरातच्या कंपनी काबुल विमानतळा पुन्हा सुरु करण्यासाठी काम करत आहे. आता युद्ध संपले असून स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना स्वीकार होईल असे सरकार स्थापन करण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे. जो कुणी शस्त्र हाती घेतो तो जनतेचा आणि देशाचा शत्रू असतो असेही त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे आक्रमक कधीच आपल्या देशाची पुनर्रचना करणार नाहीत याची जाणीव देशातील लोकांना आहे. ते करण्याची जबाबदारी आमच्या लोकांची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढच्या काही दिवसात काबुलमध्ये नव्या सरकारची घोषणा केली जाईल.
तालिबानने १६ ऑगस्ट रोजी काबूलमधील राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करुन सत्ता काबीज केल्यावर सत्ता स्थापनेची तारीख पुढे ढकलण्याची ही दुसरी वेळ आहे. या सुरु असणाऱ्या आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये तालिबानकडून मंत्रालयांची जबाबदारी कोणाकडे देण्यात आलीय यासंदर्भातील घोषणा होण्याची अपेक्षा असून या सरकारचे नेतृत्व तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल घनी बरादर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज करणाऱ्या तालिबानला मान्यता द्यावी की नाही यासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघाची भूमिका स्पष्ट नसतानाच जागतिक स्तरावरील या सर्वात मोठ्या संघटनांपैकी एक असणाऱ्या युएनकडून तालिबानला मोठा दिलासा मिळाला आहे. अफगाणिस्तानला आमची मदत मिळत राहील असे यूएनने स्पष्ट केलं आहे.