IndiaNewsUpdate : ब्राम्हणांच्या विरोधात वक्तव्य, मुख्यमंत्र्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा !!

रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्यामुळे त्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांचे वडील नंदकुमार बघेल यांनी , “मी भारतातील सर्व गावकऱ्यांना आवाहन करतोय की ब्राह्मणांना तुमच्या गावात येऊ देऊ नका. मी इतर सर्व समुदायाशी देखील यांसंदर्भात बोलेल, जेणेकरून आपण त्यांच्यावर बहिष्कार टाकू शकू. ब्राम्हणांना व्होल्गा नदीच्या तीरावर परत पाठवण्याची गरज आहे,” असे म्हटले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, या देशात कायदा सर्वोच्च आहे आणि त्यांचे सरकार सर्वांसाठी आहे. “कोणीही कायद्याच्या वर नाही, जरी ती व्यक्ती माझे ८६ वर्षांचे वडील असले तरीही. छत्तीसगड सरकार प्रत्येक धर्म, पंथ, समुदाय आणि त्यांच्या भावनांचा आदर करते. माझे वडील नंदकुमार बघेल यांनी एका विशिष्ट समुदायाविरोधात टिप्पणी केली आहे. त्यांनी सांप्रदायिक शांतता भंग केली असून त्यांच्या वक्तव्यामुळे मलाही दु: ख झाले आहे,” असे मुख्यमंत्री बघेल म्हणाले.
“माझे आणि माझ्या वडिलांचे राजकीय विचार आणि विश्वास वेगळे आहेत. एक मुलगा म्हणून मी त्यांचा आदर करतो पण मुख्यमंत्री म्हणून मी त्यांची अशी चूक माफ करू शकत नाही, ज्यामुळे राज्यातील सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता बिघडू शकते,” असेही मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहे.
ब्राह्मण समाजाविरुद्ध कथित अपमानास्पद शेरेबाजी केल्याच्या आरोपाखाली छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरुद्ध रायपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वडिलांवरच गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून पोलिसांचं कौतुक केलं जात आहे.