MumbaiNewsUpdate : चर्चेतली बातमी : करुणा शर्मा पत्रकार परिषद प्रकरणी धनंजय मुंडे यांचे प्रसार माध्यमांना पत्र…

मुंबई : राज्याचे संजकल्याणमंत्री धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांच्यातील वाद चालूच असल्याचे चित्र आहे . दरम्यान करून शर्मा यांनी फेसबुक लाईव्ह करून ५ सप्टेंबरला पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्या लाईव्हमध्ये सांगितले होते. हे समजताच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वकील सुषमा सिंह यांच्यामार्फत सगळ्या प्रसारमाध्यमांना पत्र पाठवले असून करूणा शर्मांना नोटीस पाठवली आहे.
आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करीत , परळी येथून पत्रकार परिषद घेत विविध कॉल रेकॉर्ड, What’s App Chat यासारखे साहित्य प्रसिद्धीस देणार असल्याचे जाहीर केले होते परंतु या प्रकरणात २८ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट व संवेदनशील असल्याने धनंजय मुंडे किंवा करुणा शर्मा यांच्याबद्दलचे कोणतेही खासगी साहित्य प्रसिद्ध किंवा प्रकाशित करण्यात निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे करुणा शर्मा यांनी जाहीर केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी असे कोणतेही साहित्य प्रसिद्ध किंवा प्रकाशित करण्याचा प्रयत्न केल्यास तो उच्च न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. न्यायिक प्रक्रियेनुसार कोणत्याही प्रसिद्धी माध्यमाने ते साहित्य प्रसिद्ध करणे देखील उच्च न्यायालयाचा अवमानच ठरतो, त्यामुळे अशा कोणत्याही साहित्याला प्रसिद्धी माध्यमांनी प्रकाशित किंवा प्रसिद्ध करू नये असे पत्र धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणातील वकील श्रीमती सुषमा सिंह यांनी सर्व प्रसारमाध्यमांना पाठवले आहे.
दरम्यान या प्रकरणात सातत्याने विविध प्रकारचे आरोप करून बदनामी करत मोठ्या स्वरूपात ब्लॅकमेलिंग केली जात असल्याचे यापूर्वीच धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अशा स्वरूपातील कोणतेही साहित्य प्रसिद्ध करणे हे त्या प्रकरणाच्या निकालावर देखील परिणामकारक ठरू शकते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा अवमान केला जाऊ नये असे ऍड. सुषमा सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.