MaharashtraPoliticalUpdate : राजू शेट्टी आणि मंदिराच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी दिली हि उत्तरे…

पुणे : राजू शेट्टी यांचे सहकार कृषीक्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊनच आम्ही त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत दिले होते. पण पुढे काय झाले माहित नाही. राज्यपालांकडे तो विषय प्रलंबित आहे. आम्ही तरी त्यांचं नाव यादीतून वगळलेले नाही’ अशी स्पष्टोक्ती शरद पवार यांनी केली. तसेच ‘राजू शेट्टींना दिलेला शब्द आम्ही पाळला आहे आता यावर त्यांनी काय विचार व्यक्त केले आहे, यावर मी बोलणार नाही’ असेही पवार म्हणाले.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी देऊन ८ महिने उलटले असले तरी हा तिढा सुटलेला नाही त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आल्याचे वृत्त आल्यानंतर त्यावरून राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले कि , राजू शेट्टींना दिलेला शब्द आम्ही पाळलाय, आता यावर त्यांनी काय विचार व्यक्त केलेत यावर मी बोलणार नाही.
पुण्यातील कर्वेनगरमधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलच्या कोनशिलेचे अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे मनपाने राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांच्या वार्डात ८ कोटी खर्च करून हि अत्याधुनिक ई लर्निंग शाळा उभारली गेली आहे. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
महाविकास आघाडीतील अनेक मंत्री आणि आमदारांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे याबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, ‘केंद्र सरकारकडून अशा संस्थांचा वापर सध्या विरोधकांना नमवण्यासाठी केला जात आहे आणि हे दूर्दैवी आहे’ . तसंच, मंदिर उघडण्याची भाजप मागणी करत आहे. पण विरोधकांनी याबाबत तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे. कोविडबद्दल केंद्र सरकारने राज्य सरकारला काही नियमावली दिली आहे. आणखी काही दिवस खबरदारी घ्यायची गरज आहे असा निर्देश आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य ती काळजी घेत आहेत, अन्य घटकांचे काही दुसरे मत असेल तर लोकशाही आहे. केंद्र सरकारच्या विचारांचे जे लोक आहेत त्यांनी तारतम्य ठेवण्याची गरज आहे’ असा टोलाही शरद पवारांनी विरोधकांना लगावला. ‘दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. इतके दिवस दिल्लीत शेतकरी बसले आहेत, त्यांची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी होती. पण दुर्दैव आहे. अनेक राज्यात असं होत आहे पण अन्य राज्यातही हा विषय आहे’ अशी नाराजीही पवारांनी यावेळी व्यक्त केली.