IndiaNewsUpdate : काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत जमावबंदी , मोबाईल इंटरनेट सेवाही तूर्त बंद

श्रीनगर : काश्मीरचे फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनानंतर खोऱ्यात तणावाचे वातावरण आहे. ९२ वर्षांचे गिलानी यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला होता. यानंतर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून या भागातील मोबाईल इंटरनेट सेवाही शनिवारी सकाळी पुन्हा एकदा बंद करण्यात आली. दोन दिवस बंद ठेवल्यानंतर शुक्रवारी रात्रीच ही सेवा बहाल करण्यात आली होती.
गिलानी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानातही राजकीय शोक पाळण्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी या भागात मोठ्या संख्येत सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन दशकांहून अधिक काळ फुटीरतावादी गटाचे नेतृत्व करून पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या गिलानी यांना त्यांच्या निवासस्थानाजवळच एका मशिदीत सुपुर्द ए खाक करण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर या भागाकडे जाणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. गिलानी हे हैदरपुरा भागाचे रहिवासी होते.