EducationNewsUpdate : शिक्षकदिनी राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार , मोदींच्या हस्ते होईल सन्मान !!

नवी दिल्ली : शिक्षक दिनी राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे. यंदा देशात ५ ते १७ सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व साजरे केले जाणार आहे. त्या अनुषंगानं देशभरातील तब्बल ४४ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
यंदा या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.यामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील अस्रल्ली गावाच्या खुर्शीद कुतुबुद्दीन शेख या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाचा समावेश आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कडोर या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार सन्मान
देशभरातून निवड झालेल्या या ४४ शिक्षकांपैकी ५ शिक्षकांचा सन्मान शिक्षक दिनाच्या दिवशी म्हणजेच ५ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. तर ७ सप्टेंबर रोजी ‘शिक्षा संमेलनात’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिक्षकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये शिक्षकांव्यतिरिक्त पालक आणि विद्यार्थी देखील सहभागी होणार आहेत.
याबाबत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सारंगी यांनी ५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान देशात शिक्षक पर्व साजरे केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.. संतोष कुमार यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. आम्ही शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन या पर्वाची सुरुवात करू असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
यंदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या शिक्षकांमध्ये महाराष्ट्र , हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, मिझोराम, त्रिपुरा , आसाम, झारखंड, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांमधील शिक्षकांचा समावेश आहे.