VidarbhaNewsUpdate : जादू टोण्याच्या संशयावरून लोखंडी रॉडला बांधून मारहाण

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी खूर्द येथे जादू टोण्याच्या संशयावरून झालेल्या अमानुष मारहाण प्रकरण संपूर्ण राज्यात गाजलेले असताना याच जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंडाळा टोली येथेही जादूटोण्याच्या संशयावरून लोखंडी रॉडला बांधून मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले कि , नागभीड तालुक्यातील मिंडाळा टोली येथे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. तर फिर्यादीच्या मुलाला मोटारसायकलने बळजबरीने आणून घरासमोरील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी रॉडला दोरीने बांधून बॅट व बांबूने मारहाण केली. फिर्यादीलाही काठीने मारून जखमी केले. दरम्यान, मंगळवारी फिर्यादीकडे कोणतेही साधन नसल्याने तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले नाही. बुधवारी या प्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदर प्रकरणाची तक्रार दाखल होताच नागभीड पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले व तपास करून आरोपींना ताब्यात घेतले. सध्या गावात शांतता कायम असून, पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, एसडीपीओ मिलींद शिंदे यांनी मिंडाळा येथे बुधवारी भेट देवून गावातील जनतेला मार्गदर्शन करीत शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात एका पाठोपाठ एक जादूटोण्याच्या संशयावरून समोर येत असलेल्या घटनांमुळे पोलीस प्रशासनातही चांगलीच खळबळ उडाली आहे.