CoronaMaharshtraUpdate : राज्यात ४ हजार ४५६ नवीन रुग्ण तर ४ हजार ४३० रुग्णांना डिस्चार्ज , १८६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

मुंबई : आज राज्यात दिवसभरात ४ हजार ४५६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर आज १८६ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. तर, दुसऱ्या बाजूला कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज ४ हजार ४३० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ७७ हजार २३० रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के एवढे झाले आहे.
सध्या राज्यात २ लाख ९० हजार ४२७ व्यक्ती होमक्कारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ०७१ व्यक्ती संस्थात्मक क्कारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५१ हजार ०७८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४ लाख ६९ हजार ३३२ झाली आहे. मुंबईत आज ४१६ नवीन करोना रुग्ण आढळले. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत ३ हजार १८७ रुग्ण उपचार घेत आहेत.
रविवारी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद
दरम्यान कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार, असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ राहूल पंडित, डॉ शशांक जोशी, डॉ. अजित देसाई मुलांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ सुहास प्रभू, तसेच अमेरिकेतील डॉ मेहुल मेहता सहभागी होणार आहेत. परिषदेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत. रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे.
या परिषदेसाठी www.facebook.com/onemdhealth यावर प्रश्न पाठवता येतील.
औरंगाबाद जिल्ह्यात ३० नवे रुग्ण
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज १४ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष ४४ हजार ३५२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ३० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष ४८ हजार १०२ झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार ५३२जणांचा मृत्यू झाल्याने एकूण २१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १३ आणि ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. तर घाटी रुग्णालयात एक ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.