WorldNewsUpdate : तालिबानी दहशतवाद्याकडून अफगाण लोकगायकाची गोळ्या घालून हत्या !!

काबुल: तालिबानच्या दहशतवाद्यांनी एका अफगाण लोकगायकाची गोळ्या घालून हत्या केली असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. लोकगायक फवाद अंद्राबी यांची शुक्रवारी अंद्राबी खोऱ्यात हत्या झाली. तालिबान्यांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर कलावंतांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गायक फवाद अंद्राबी यांचा मुलगा जवाद याने ‘द एसोसिएटेड प्रेस’ला सांगितले की, तालिबानी त्यांच्या घरात घुसले. चहा घेत असताना त्यांनी घराची झडती घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या घरातून फरफटत नेण्यात आले. जवादने सांगितले की, वडील निर्दोष असून ते फक्त गायनातून लोकांचे मनोरंजन करत होते. त्यानंतरही तालिबानींनी त्यांची हत्या केली.
Taliban’s brutality continues in Andarab. Today they brutally killed folkloric singer, Fawad Andarabi who simply was brining joy to this valley and its people. As he sang here “our beautiful valley….land of our forefathers…” will not submit to Taliban’s brutality. pic.twitter.com/3Jc1DnpqDH
— Masoud Andarabi (@andarabi) August 28, 2021
स्थानिक तालिबान परिषदेने या हत्येचा निषेध केला असून संबंधित दोषीला शिक्षा देणार असल्याचे सांगितले आहे. तर तालिबानी प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान अफगाणिस्तानचे माजी मंत्री मसूद अंद्राबी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तालिबान्यांची क्रूरता कायम असून त्यांनी लोकगीत गायक फवाद अंद्राबी यांची हत्या केली असल्याचे म्हटले.
अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आल्यापासून अनेक खोऱ्यामध्ये अशांतता दिसून येत आहे. तालिबान पुन्हा एकदा १९९६ सारखी परिस्थिती निर्माण करत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अंद्राबी खोरे हे काबूलपासून १०० किलोमीटर अंतरावरील उत्तर बागलान प्रांतात आहे. या भागातील काही जिल्हे तालिबानी राजवटीला विरोध करणाऱ्यांच्या ताब्यात आले होते. मात्र, तालिबानच्या म्हणण्यानुसार त्यांनी ते जिल्हे परत घेतले आहेत. दरम्यान हिंदुकुश पर्वतांमध्ये स्थित पंजशीर हा भाग अफगाणिस्तानच्या ३४ प्रांतांपैकी एक असून यावर अजूनही तालिबान्यांचे नियंत्रण नाही.
महिला पत्रकार बेहेश्ता अर्गंद यांनी सोडला देश
एकीकडे तालिबान आपली प्रतिमा उजळ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे वास्तविक परिस्थिती वेगळी आहे. दरम्यान तालिबान नेत्याची मुलाखत घेणारी महिला पत्रकार बेहेश्ता अर्गंद यांनीही आता अफगाणिस्तान सोडले आहे. अफगाणिस्तानमधील वृत्तसंस्था टोलो न्यूजच्या पत्रकार बेहेश्ता अर्गंद यांनी तालिबान नेत्याची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची जगभरात चर्चा झाली होती. त्यावेळीदेखील तालिबान सुधारत असून आपली प्रतिमा चांगली तयार करत असल्याचा दावा अनेकांनी केला होता. तर, तालिबानचे हे दाखवायचे दात असून मूळ कट्टरतावादी प्रवृत्ती कायम असल्याचीही टीका अनेकांनी केली होती.
…. तेंव्हा मी पुन्हा परत येईल
तालिबानच्या भीतीमुळेच ‘टोलो न्यूज’च्या २४ वर्षीय पत्रकार बेहेश्ता अर्गंद यांनी आपल्या कुटुंबासह त्यांनी देश सोडला आहे. अर्गंद यांनी म्हटले की, मला पु्न्हा अफगाणिस्तानमध्ये परतायचे आहे. तालिबान सध्या महिलांना अधिकार देण्याच्या गोष्टी करत आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वागणूक दिल्यास आणि अफगाणिस्तानमधील परिस्थिती सुधरल्यास पुन्हा मायदेशी येईल आणि आपल्या लोकांसाठी काम करेल.
अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत अर्गंदने म्हटले की, मीदेखील लाखो लोकांप्रमाणे तालिबानला घाबरते. काबूल विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतलेल्या अर्गंद यांनी टोलो न्यूजआधी काही रेडिओ स्टेशन आणि वृ्त्तसंस्थांसाठी काम केले आहे. टोलो न्यूजमध्ये रुजू झाल्यानंतर एक महिन्यातच तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. हेश्ता अर्गंद यांनी म्हटले की, तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर त्यांच्या प्रतिनिधीची मुलाखत घेणे कठीण होते. मात्र अफगाणिस्तानच्या महिलांसाठी मी मुलाखत घेतली. कुठून तरी सुरूवात करायची होती. आम्हा महिलांनादेखील अधिकार हवेत, आम्हाला देखील काम करायचे आहे, समाजात सन्मानाने राहण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे तालिबानी नेत्याला सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान अफगाणिस्तानमधून केलेल्या पलायनाबाबत हेश्ता अर्गंद यांनी म्हटले की, तालिबानने जी आश्वासने दिलीत, त्यावर ते ठाम नसल्याचे चित्र आहे. तालिबानकडून माध्यमांना धमकी देण्यासह विविध निर्बंध लादणे सुरू झाले. तालिबानची भीती वाटत असल्याने देश सोडावा लागला. त्यामुळे मलालाची मुलाखत घेतल्यानंतर दोन दिवसांनी एका कार्यकर्त्याच्या मदतीने त्यांनी कतार हवाई दलाच्या विमानातून अफगाणिस्तान सोडले.