DahiHandiNewsUpdate : सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेची दही हंडी

मुंबई : राज्यशासनाच्या विरोध असतानाही हा विरोध झुगारून देत मुंबईसह ठाण्यात जन्माष्टमीचे औचित्य साधून मनसैनिकांनी अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली कुठे तीन थरांची तर कुठे चार तर कुठे पाच थर लावून मनसैनिकांनीच दहीहंडी फोडत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
ठाण्यातील वर्तकनगर येथील लक्ष्मी पार्क चौकात मनविसेचे जिल्हाप्रमुख संदिप पाचंगे आणि मनसैनिकांनी दहिहंडी लावून मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडून मनसेचा झेंडा हातात घेवून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तर ठाण्यातील नौपाडा येथील मनसेचे मुख्य कार्यालय येथे देखील मनसैनिकांनी दहीहंडी फोडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी मंडळांची नुकतीच बैठक घेऊन कोरोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यासह, मुंबईत अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडी उभारली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडा फडकवला.
ठाण्यात दहिहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू, असे मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटले होते. दहीहंडी साजरी करण्यावरून ठाण्याचे मनसे प्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देशपांडे यांनी ही भूमिका घेतली होती. त्यानंतर ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे दहीडंडी फोडत राज्य सरकारच्या निर्बंधांचा निषेध करण्यात आला. तर सरकारच्या अटीला झुगारून मनसेने घाटकोपर येथील भटवाडी येथे राजू सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोपाळकाला साजरा करण्यात आला.
दरम्यान नाशिकमध्येही मनसे कार्यकर्त्यांनी दहीहंडी फोडून सरकारचा निषेध नोंदविला आहे. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती.सत्तेत असलेल्या पक्षाचे कार्यक्रम होतात मग हिंदू सणावर बंदी का असा सवाल देखील यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर आम्ही असे निर्बंध पाळणार नसल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.