MaharashtraNewsUpdate : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची पोलीस ठाण्यात आज पहिली हजेरी

रायगड : आपल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. महाड न्यायदंडधिकाऱ्यांनी राणेंना सशर्त जामीन मंजूर केला असला तरी आज ३० ऑगस्ट रोजी अलिबाग पोलिस स्थानकात हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला आहे.त्यानुसार आज नारायण राणे अलिबाग पोलिस स्टेशनला एनसीपीकडे हजेरी लावण्याची शक्यता आहे.
दरम्यान नारायण राणे अलिबागला येणार असल्यामुळं परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. कोर्टानं राणेंना महिन्यातून दोन वेळा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी केलेल्या टीकेनंतर राज्यात वातावरण तापले होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या पार्श्वभूमीवर राणेंना अटक करण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार राणेंवर कारवाई करण्यात आली होती.
नारायण राणेंवर कारवाई केल्यानंतर महाड न्याय दंडाधिकारी बाबासाहेब शेख यांच्या कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता. न्याय दंडाधिकाऱ्यांनी अटीशर्ती ठेवून जामीन मंजूर केला होता. त्यानुसार राणे आज अलिबाग पोलिसांसमोर हजेरी लावणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.