NagpurNewsUpdate : श्रामणेरी भिक्खूणीची भिक्खुकडूनच हत्या , नागपुरात खळबळ

नागपूर : नागपुरातील बोधी निवासात एका महिला बौद्ध भिक्खुची सोबत राहत असलेल्या बौद्ध भिक्खुने हत्या केल्याची घटना घडली आहे. बुद्ध विहारातच ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दहेगाव पिवळा इथं असलेल्या शिवली बोधी भिक्खु निवासात ही घटना घडली आहे. श्रामनेरी बौद्धप्रिया असे मृत महिला भिक्खुचं नाव आहे. याच निवासात आरोपी भदंत धम्मानंद थेरा राहत होता. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होत होते.
आज पुन्हा एकदा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले . भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे रागाच्या भरात भदंत धम्मानंद याने चाकू आणि लोखंडी रॉडने श्रामनेरी बौद्धप्रिया यांच्यावर वार केले. चाकूचे वर्मी घाव बसल्यामुळे श्रामनेरी बौद्धप्रिया यांचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी भिक्खु निवासाकडे धाव घेतली. घटनास्थळी श्रामनेरी बौद्धप्रिया यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळावर चाकू आणि लोखंडी रॉड पोलिसांनी ताब्यात घेतले. श्रामणेरी बौद्धप्रिया यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणात खापरखेडा पोलिसांनी आरोपी भदंत धम्मानंद याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.