MaharashtraNewsUpdate : आधी जुने कर्ज फेडून घेतले आणि नवे कर्ज देण्यास टाळाटाळ केली, शेतकऱ्याची आत्महत्या

दौंड : आधीचे कर्ज परत केल्यास नवीन कर्ज देऊ असे सांगूनही बँकेने हात वर केल्यामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईडनोटमध्ये हि माहिती दिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
नानासाहेब मच्छिंद्र शेळके असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.
दरम्यान सुसाईडनोटवरून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज न दिल्यामुळे हि आत्महत्या झाली असल्याचा आरोप शेळके यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या चिट्ठीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात आणि अधिकाऱ्यांची नावे दिली आहेत. या शेतकऱ्याने दूध व्यवसायावर ३५ लाख रुपये कर्ज मागितले होते. मात्र, अडीच एकर क्षेत्राचे कारण पुढे करून बँकेने कर्ज देण्याची तयारी दाखवली नाही परिणामी आलेल्या नैराश्यातून त्यांनी हि आत्महत्या केली असा शेळके यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.
शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे कि ,
माझ्याकडे जुने कर्ज होते. नवीन कर्ज काढून देतो असे सांगण्यात आले होते . मी त्यांना निवडणुकीत मदत केली. माझा वापर त्यांनी फक्त मतदानासाठी केला. माझी परिस्थिती नसतानाही त्यांनी कर्ज भरायला लावले. मी ते पैसे बाहेरून जमा केले. मला कर्ज प्रकरणाचे संपूर्ण पेपर जमा करण्यासाठी सांगितले. मी कर्ज पूर्ण भरल्यावर मला कर्ज देण्यास टाळाटाळ केली. मी थोरात यांच्याकडे विनंती केली त्यांनी होकार दिला आणि आमच्यासमोर फोनवर सांगितले. नंतर अधिकारी सोसायटी सचिव यांनी गडदरे साहेब, संदीप काळे यांनी माझा विश्वासघात केला. मी अजित पवार यांच्याकडे निवेदन दिलं. पण, त्यानंतरही अधिकाऱ्यांनी मला उडवाउडवीची उत्तर दिली. गावात इतर लोकांना कर्ज देण्यात आली. मी, फक्त दूध व्यवसायासाठी कर्ज मागितले होते. मला खूप त्रास सहन करावा लागला. माझी मानसिक स्थिती खूप बिघडली आहे व असा अन्याय कुणावरही करू नये. माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ नये. माझ्या मृत्यूनंतर जमीन ही माझ्या नातेवाईकांना द्यावी.