Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आज सर्वपक्षीय बैठक

Spread the love

मुंबई : ओबीसी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता सह्याद्री गेस्ट हाउसवर ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, राज ठाकरे, राजू शेट्टी यांच्यासह २७ नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामधील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर यातून मार्ग काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण संपुष्टात आले असून या विषयावरून ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्याच्या कलम १२ (२)(सी) आणि राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनांनुसार आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असेल तर ते अवैध आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशावर राज्य सरकार व इतरांनी पुनर्विचार याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिकांवर सुनावणी घेऊन मूळ आदेश कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या होत्या.

तसेच या आदेशामुळे वाशीम, अकोला, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये अतिरिक्त आरक्षित जागांवर निवडून आलेल्या सदस्यांची निवडणूक अवैध ठरवून व इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित जागांवरील निवडणूक अवैध ठरवून नव्याने निवडणूक घेण्यात यावी. अतिरिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घ्यावी व त्याकरिता दोन आठवड्यात प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या आदेशाचा फटका २७ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) सदस्यांना बसला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!