IndiaNewsUpdate : Good News : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी पहिल्यांदा विराजमान होणार या महिला न्यायायमूर्ती

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयानुसार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरन्यायाधीश पदावर महिला न्यायाधीशांची नियुक्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं प्रस्तावित केलेल्या सर्व ९ नावांना मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यात या सर्व न्यायाधीशांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. यामध्ये न्या. बी. व्ही. नागरत्ना यांचे नाव पुढे आहे.
लिस्टमध्ये असलेल्या ९ नावांपैकी ८ जण उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, तर एकजण सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत. यामध्ये कर्नाटक हायकोर्टाचे चीफ जस्टिस ए.के. ओका, गुजरात हायकोर्टाचे चीफ जस्टिस विक्रम नाथ, सिक्किम हायकोर्टाचे जस्टिस जे.के. माहेश्वरी, तेलंगणा हायकोर्टाचे चीफ जस्टिस हिमा कोहली, जस्टिस बी.वी नागरत्ना, केरळ हायकोर्टाचे जस्टिस सी.टी. रविकुमार, मद्रास हायकोर्टाचे जस्टिस एम.एम. सुंदरेश, गुजरात हायकोर्टाचे जस्टिस बेला. एम. त्रिवेदी आणि सीनियर अटॉर्नी पी.एस नरसिम्हा यांच्या नावांचा समावेश आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कॉलेजियममध्ये एकाच वेळी तीन महिलांची नावे आली आहेत.
दरम्यान शपथविधी पार पडल्यानंतर न्या. बी. व्ही. नागरत्ना या देशाच्या सरन्यायाधीशपदाच्या शर्यतीत दाखल होतील आणि सेवा ज्येष्ठतेच्या निकषानुसार २०२७ साली त्या देशाच्या सरन्यायाधीश होऊ शकणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने ज्या ९ नावांची शिफारस केली आहे, त्यातील ३ न्यायाधीश हे देशाचे सरन्यायाधीश होऊ शकणार आहेत. फेब्रुवारी २०२७ मध्ये न्या. सूर्यकांत के. सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. विक्रम नाथ सरन्यायाधीश होतील. ते निवृत्त झाल्यानंतर भारताला पहिल्या महिला सरन्यायाधीश मिळणार आहेत. एका महिन्यापेक्षा अधिक काळ त्या या पदावर राहतील, असा अंदाज आहे.