PuneNewsUpdate : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आणि हसमुख रावल यांना ‘आबासाहेब वीर पुरस्कार’

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ आणि आरोग्य सेवेत क्रांती करणारे माय लॅबचे संस्थापक हसमुख रावल यांना ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला. दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरण सोहळा होणार नसून पुरस्कारार्थींना त्यांच्या पुणे येथील बाबा आढाव यांना हमाल पंचायत येथे तर रावल यांना निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.
कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ गेल्या पंचवीस वर्षांपासून ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे पंचवीसावे वर्ष आहे. एक लाख रूपये आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात समाजहिताचे कार्य अखंडपणे करित युवा पिढीला प्रेरक ठरणान्या तसेच जुन्या पिढीबरोबरच नव्या पिढीचाही सन्मान व्हावा या उद्देशाने ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष असून एक्कावन्न हजार रूपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कष्टकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढा
डॉ. बाबा आढाव यांनी कष्टकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्याप्रती केलेल्या कार्याचा उचित गौरव व्हावा, या भावनेतून त्यांना हा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करताना किसन वीर व्यवस्थापनास मनस्वी आनंद होत असल्याचे मदनदादा भोसले यांनी यावेळी सांगितले. तर हसमुख रावल यांनी सर्वसामांन्यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविण्याच्या ध्यासातून केलेल्या महत्वपूर्ण कार्यासोबत देशातील पहिल्या स्वदेशी कोविड १९ आरटी पीसीआर टेस्ट किटची यशस्वी निर्मिती करुन या बिकट परिस्थितीत महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या कार्याचा गौरव आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
आतापर्यंतचे पुरस्काराचे मानकरी
आतापर्यंत प्रा. ग. प्र. प्रधान, बाळासाहेब भारदे, डॉ. आप्पासाहेब पवार, भाऊसाहेब थोरात, ना. धों. महानोर, मधुकरराव चौधरी, पी. डी. पाटील, डॉ. मोहन धारिया, डॉ. निर्मलाताई देशपांडे, क्रांतिवीर डॉ. नागनाथ नायकवडी, डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील, प्राचार्य पी. बी. पाटील, अॅड. रावसाहेब शिंदे, बाळासाहेब विखे पाटील, प्रतापराव भोसले, कल्लाप्पाण्णा आवाडे, डॉ. पतंगराव कदम, न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, भि. दा. भिलारे गुरूजी, शंकरराव कोल्हे, विनायकराव पाटील, बी. जे. खताळ, गणपतराव देशमुख या तेवीस व्यक्ती आणि राजर्षि शाह ट्रस्ट या संस्थेस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर पहिल्या वर्षी युवा उद्योजक आणि बीव्हीजी इंडियाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांना व हिवरे बाजारचा सर्वागिण विकास करणारे पोपटराव पवार यांना दुसऱ्या तर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलासराव शिंदे यांना तिसरा, चौथ्या वर्षी हा पुरस्कार गणेश हिंगमिरे, पाचव्या वर्षी पुण्याच्या प्रदिप लोखंडे यांना आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाच्या पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी प्रा. संभाजीराव पाटणे, प्रा. वसंतराव जगताप, अनिल जोशी, उपराकार लक्ष्मण माने, प्रल्हादराव चव्हाण, प्रा. रमेश डुबल आणि प्रताप देशमुख यांची समिती गठीत करण्यात आलेली होती. या समितीने एकमताने केलेली शिफारस संचालक मंडळाच्या बैठकीतही एकमताने स्वीकारण्यात आल्याचेही भोसले यांनी सांगितले.