MaharashtraNewsUpdate : बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्सवादाच्या भाष्यकार डॉ. गेल ओम्व्हेट यांचं निधन

सांगली : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची नव्या पद्धतीची मांडणी समाजापुढे आणणाऱ्या जेष्ठ संशोधक -लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळीमध्ये काम करणाऱ्या विचारवंत कार्यकर्त्या डॉ. गेल ओम्व्हेट यांचं आज वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या त्या पत्नी होत.
डॉ. गेल लॉकडाऊननंतर त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कासेगाव येथील घरी डॉ. भारत पाटणकर यांच्या देखरेखेखाली वैद्यकीय उपचार घेत होत्या.
मूळच्या जन्माने अमेरिकेच्या असलेल्या गेल यांनी तिथेच पदव्युत्तर शिक्षण घेतले . त्यानंतर त्या भारतात आल्या, वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली.
डॉ. गेल यांची पंचवीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हिण मुव्हमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, यांचा समावेश आहे.