NashikNewsUpdate : नाशिक पोलीस आयुक्तांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश

नाशिक: ‘अटक करायला मी नॉर्मल माणूस वाटलो का? अटकेचा आदेश काढणारे राष्ट्रपती आहेत का?,’ असा सवाल राणेंनी यांनी केला आहे. त्यावर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणेंच्या अटकेची तयारी सुरू केली आहे. हे समजताच नारायण राणे भडकले आहेत.
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांच्यावरील संभाव्य कारवाईबद्दल पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे कि, ‘शिवसेनेचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्ह्याचा प्रकार आणि गांभीर्य बघता नारायण राणे यांना अटक करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करून न्यायालयात हजर केले जाईल, त्यानंतर न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल. राणेंनी आपले निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावे ,’ असेही पांडे यांनी यावेळी स्पष्ट केले .
राष्ट्रपती आणि राज्यपाल यांनाच फक्त अटक करता येत नाही
अटक करायला मी नॉर्मल माणूस वाटलो का? यावर आपली प्रतिक्रिया देताना पांडे म्हणाले कि , ‘नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर राज्यसभेचे अध्यक्ष असलेल्या उपराष्ट्रपतींना माहिती दिली जाईल. त्याचबरोबर, इंटेलिजन्स ब्युरो, एसआयटी, जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी या सर्वांना माहिती दिली जाईल. राज्यघटनेनुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांवर क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना ती मुभा नाही. ‘फॅक्ट ऑफ द केस’ पाहून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारवाईची गरज का वाटली याची संपूर्ण माहिती आदेशात देण्यात आलेली आहे, असेही पांडे म्हणाले.