WorldNewsUpdate : तालिबानचा अमेरिकेला निर्वाणीचा इशारा

काबुल : अमेरिका आणि अन्य नाटो देशांच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून जवळपास काढता पाय घेतला असला तरी काबुल विमानतळावर अद्याप बचाव मोहीम सुरू असल्याने अमेरिका आणि नाटोचे सैनिक काबुल विमानतळावर तैनात आहेत. यादरम्यान तालिबानने ३१ ऑगस्टपर्यंत आपले सर्व सैन्य बाहेर काढण्याची धमकी अमेरिकेला दिली आहे. दरम्यान या आधी लोकांच्या बचाव कार्यात तालिबानने अडथळे जाण्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेने तालिबानला दिला आहे त्यानंतर तालिबाननेही अमेरिकेला हि धमकी दिली आहे.
सोमवारी तालिबानचा प्रवक्ता सोहेल शाहीनने कतारमध्ये सांगितले की, जर अमेरिकेने आपल्या सैनिकांना माघारी बोलावण्यात उशीर केला तर त्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील. अमेरिकन सैनिकांच्या माघारीसाठी ३१ ऑगस्ट हीच डेडलाईन तालिबानकडून घोषित करण्यात आली आहे. एकीकडे तालिबानने जगातील अनेक देशांना त्यांच्या काबुलमधील वकिलाती सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यासाठी सुरक्षा देण्याचीही घोषणा केली आहे. मात्र दुसरीकडे तालिबानने अमेरिकेला मात्र निर्धारित केलेल्या डेडलाईनमध्येच अफगाणिस्तान सोडण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान ३१ ऑगस्टपर्यंत रेस्क्यू मिशन पूर्ण करून आपल्या सैनिकांना माघारी बोलावू, असे अमेरिकेने आधी सांगितले होते. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जर मोहीम पूर्ण झाली नाही तर अमेरिकन सैनिक ३१ ऑगस्टनंतरही अफगाणिस्तानमध्ये राहू शकतात, असे संकेत दिले होते. तत्पूर्वी ११ सप्टेंबरच्या आत अफगाणिस्तान सोडण्याची घोषणा अमेरिकेने केली होती. अमेरिकन सैन्य माघारी परतण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. मात्र आताही सुमारे ५ हजारांहून अधिक अमेरिकन सैनिक काबुल विमानतळावर उपस्थित आहेत. तसेच बचाव मोहिमेला तडीस नेत आहे. त्याशिवाय नाटो देशांचे सैनिकही येथून आपापल्या देशांच्या नागरिकांना बाहेर काढत आहेत.