WorldNewsUpdate : तालिबानवर जी ७ देशातील नेत्यांची उद्या तातडीची बैठक

लंडन : अफगाणिस्तान आणि तालिबान प्रश्नावर विचार विनिमय करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जी ७ देशांची तातडीची बैठक बोलवली आहे. गेल्या आठवड्यात बायडेन आणि जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली होती. संयुक्त धोरण ठरवण्यासाठी २४ ऑगस्टला या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. जी ७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे.
“अफगाणिस्तानातील परिस्थितीवर तातडीने येत्या २४ ऑगस्टला जी ७ देशातील नेत्यांची बैठक बोलवली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र काम करणे गरजेचे आहे. सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करणे, मानवतावादी संकट टाळणे, तसेच अफगाणिस्तानातील नागरिकांचं गेल्या २० वर्षातील जीवनमान सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.”, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट केले आहे.
I will convene G7 leaders on Tuesday for urgent talks on the situation in Afghanistan. It is vital that the international community works together to ensure safe evacuations, prevent a humanitarian crisis and support the Afghan people to secure the gains of the last 20 years.
— Boris Johnson (@BorisJohnson) August 22, 2021
अफगाणिस्तानात तालिबानने काबूल जिंकून सत्ता प्रस्थापित केली होती. त्यावेळी अध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून गेले. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दुसरीकडे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे अफगाणिस्तानातील परिस्थितीवर जागतिक पातळीवर वेगवेगळ्या देशांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत.
दरम्यान तालिबानविषयी नेमका काय निर्णय घ्यावा याबाबत अनेक देशांच्या सरकारमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सत्तेनंतर आता नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे. तालिबानच्या भीतीने अनेक नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. अशातच देश सोडून जाणाऱ्या नागरिकांची विमानतळावर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती ब्रिटीश लष्कराने दिली आहे.