VidarbhaNewsUpdate : जादू टोण्याच्या संशयावरून मागास समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण

Women from backward communities, elderly people beaten up on suspicion of witchcraf
चंद्रपूर : जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी मागास समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली असल्याचे वृत्त आहे. या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चंद्रपूरजिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १२ किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात ही घटना शनिवारी घडली. या प्रकरणी जिवती पोलिसांनी १२ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. सुग्रीव शिंदे, दत्ता कांबळे, प्रकाश कोटंबे, दादाराव कोटंबे, बालाजी कांबळे, अमोल शिंदे, गोविंद येरेकर, केशव कांबळे आणि सुरज कांबळे अशी या आरोपींची नावे आहेत.
याबाबत लोकमत ऑनलाईनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे कि , गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी आल्या आणि त्यांनी दलित समाजातील वयाने ज्येष्ठ आठ-दहा लोकांची नावे घेऊन त्यांनी भानामती केल्याचे सांगितले. त्याला बळी पडून गावातील काही लोकांनी त्या सर्वांना भरचौकात खांबांना बांधून बेदम मारहाण केली. वृद्ध, महिलांनाही मारहाण करण्यात आली. हा प्रकार सुरू असताना गावातील इतर लोक मूक दर्शक बनले होते. भीतीने कुणीही मध्ये पडले नाही. यात ७ जण जखमी झाले. त्यांना जिवती ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर दोघांना घरी पाठवण्यात आले, तर पाच गंभीर जखमींना चंद्रपूरला हलविण्यात आले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार संतोष अंबिके यांनी फरार आरोपी रात्री गावात झोपण्यास येतील या दृष्टीने पाळत ठेवली होती. त्यावेळी सापळा रचून त्यांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींमध्ये तीन महिला आहे. त्यांच्या अंगात येत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे. दंगा प्रकरणी भादंवि कलम १४३, १४७, ३२५,१४९, ३४२ आणि जादूटोणा विरोधी कायदा कलम ३अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या १२ आरोपींना आता न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.