MaharshtraNewsUpdate : माजी वन मंत्री संजय राठोड यांना “त्या ” महिलेच्या आरोपातून पोलिसांकडून ” क्लिन चिट”

यवतमाळ: माजी मंत्री आमदार संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याच्या महिलेने केलेल्या तक्रारीत कुठलेही तथ्य नसल्याची माहिती यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. या तक्रारीच्या चौकशीत माजी मंत्री तथा शिवसेना आमदार आमदार संजय राठोड यांच्याविरुद्ध आपण कोणतीही तक्रार केलेली नाही. हा खोडसाळपणा आहे, असे महिलेने आपल्या जबाबात म्हटले असल्याची माहिती डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली. त्यामुळे संबंधित प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांना क्लीनचिट देण्यात आली आहे.
कथित माहितीनुसार माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्याविरुद्धची तक्रार पोस्टाद्वारे घाटंजी पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविली होती. यावरून विरोधी पक्षांनी राठोड यांच्यावर निशाणा साधल्यानंतर या तक्रारीची गंभीर दखल घेत विशेष चौकशी पथक नेमण्यात आले होते. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून चौकशीअंती राठोड यांना क्लीनचिट देण्यात आली आहे.
राठोड यांच्यावर तक्रार नेमकी काय होती ?
उघड झालेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील सेवानगर येथील एका महिलेने एका महिलेने पोस्टाद्वारे लेखी तक्रार घाटंजी पोलीस स्टेशनसह पोलीस अधीक्षक कार्यालयात दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी घटनेची गंभीर दखल घेत अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या नेतृत्वात एसआयटी नेमली होती.
याबाबत एसआयटीने केलेल्या चौकशीत पहिल्या दिवशी महिलेने वडिलांची प्रकृती बरोबर नाही. माझी मनस्थिती बरोबर नाही, असे सांगून जबाब देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर गेल्या शनिवारी (१४ ऑगस्ट) ही महिला विशेष चौकशी पथकासमोर आली. या महिलेचा जबाब इन कॅमेरा नोंदविण्यात आला. दरम्यान आपण आमदार संजय राठोड यांच्याबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यावरील स्वाक्षरी माझी नाही. पतीचे नावही चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आले आहे. कुणीतरी हा खोडसाळपणा केला आहे, असे महिलेने आपल्या जबाबात नमूद केले. तर,आमदार संजय राठोड यांचाही जबाब नोंदविण्यात आला असून, त्यांनी आरोप फेटाळले आहे. आता पोलीस अधीक्षकांनीच याबाबत अधिकृत माहिती दिली असून राठोड यांच्याविरुद्धच्या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
या क्लिन चिट नंतर राठोड यांनी “सत्य परेशान हो शकता है , पराजित नही..” असे ट्विट केले आहे तर या प्रकरणात आवाज उठवलेल्या भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी मग आता हि तक्रार करण्याचा खोडसाळपणा नेमका कोणी आणि का केला हे तपासण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. ते पोलिसांनी शोधावे अशी मागणी केली आहे.