MaharashtraNewsUpdate : राज्यातील हाॅटेल आणि माॅल चालकांना सरकारकडून Good News

मुंबई : राज्य सरकारने आता हॉटेल्स आणि बाजारपेठा रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. पण, धार्मिक स्थळं आणि सिनेमागृह बंदच राहणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल रितसर माहिती दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले कि , आज मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विभागाकडून निर्बंध कमी करण्याबाबत प्रस्ताव गेला होता, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली असून या निर्णयानुसार राज्यातील हॉटेल्स आणि मॉल सुरू करण्याबाबत टोपे यांनी घोषणा केली आहे.मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरं सुरू करण्यात यावी अशी मागणी होत असली तरी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता धार्मिक स्थळं उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत धार्मिक स्थळे बंदच राहतील. शिवाय सिनेमागृह , नाट्यगृह सुद्धा बंद राहणार असल्याचेही टोपे म्हणाले.
दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश
दरम्यान २ डोस झालेल्यांना लोकल ट्रेन प्रवास करायला मान्यता दिली असून आहे. मासिक आणि त्रैमासिक पासशिवाय बळजबरीने प्रवास करणारांना ५०० रू दंड भरावा लागणार आहे. तसेच ‘शॉपिंग मॉल १० पर्यंत सुरू असणार मात्र दुसरा डोस घेणे अनिवार्य, दुसरा डोस झालेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जाईल’ असंही टोपे म्हणाले.
दुकाने राहतील १० पर्यंत उघडी
राज्य सरकारने सर्व दुकाने १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून उपहार गृहांना ५०% आसनावर मान्यता देण्यात आली आहे. उपहारगृहात जे लोक वेटिंगमध्ये असतील त्यांना मास्क घालणे आणि वेटर आणि कर्मचारी यांनी दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे टोपे म्हणाले. दरम्यान सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱयांना प्राधान्यक्रमाने लस देण्यात येणार आहे. तसेच, खासगी कार्यालये २४ तास सुरू राहू शकतील हा निर्णयसुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच इनडोअर स्पोर्टसलाही मान्यता देण्यात आली आहे, असंही टोपेंनी सांगितले.
…तर पुन्हा लागू शकतो लाॅकडाऊन
दरम्यान तिसऱ्या लाटेचा विचार करता राज्यात २०० मेट्रिक टन ऑक्सीजन वाढवला जाणार असून १४१ ऑक्सीजन प्लांटना मान्यता दिली आहे. ३८०० मेट्रीक टन ऑक्सीजन लागू शकतो, तिसऱ्या लाटेत ७०० मेट्रीक टन ऑक्सीजन ज्यावेळी लागेल त्या दिवशी पुन्हा लॉकडाऊन लागेल, असा इशाराही टोपे यांनी यावेळी दिला.
विद्यापीठ आणि काॅलेजचा निर्णय नंतर
शाळा आणि कॉलेजच्या बाबतीत शिक्षण विभाग आणि टास्क फोर्सची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंकडून सकारात्मक अहवाल आल्यानंतर शाळा, कॉलेजच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल असेही टोपे म्हणाले.