IndiaNewsUpdate : राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराच्या नावात मोदी सरकारने केला बदल !!

नवी दिल्ली : मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्याने हा पूरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये मोदींनी म्हटले आहे की, खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले जावे यासाठी आपल्याला देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या , त्यामुळे देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावे देणे योग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचे नाव देणेच योग्य आहे” असेही मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
त्याचबरोबर ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या अतुलनीय प्रयत्नांमुळे आपण सर्व भारावून गेलो आहोत. विशेषतः हॉकीमध्ये आमच्या मुला -मुलींनी दाखवलेली इच्छाशक्ती, विजयाच्या दिशेने दाखवलेली जिद्द वर्तमान आणि भावी पिढीसाठी एक मोठी प्रेरणा आहे,” असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.