MumbaiNewsUpdate : धक्कादायक : क्वारंटाईनच्या भीतीने कोरोनाबाधित वडिलांचा मृतदेह घरातच ठेवला !!

मुंबई : मृत्यू झालेल्या वडिलांचा मृतदेह घरातच लपवून ठेवत दोन बहिणींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वारंटाईन करतील या भीतीने त्यांनी मृतदेह चार दिवस घरातच ठेवला होता. यानंतर दोघी बहिणींनी आत्महत्येचा प्रयत्न केला असता एकीचा मृत्यू झाला. विरारमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. हरिदास सहारकर असे मृत व्यक्तीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ ऑगस्टला हरिदास यांचा मृत्यू झाला होता. यानंतर त्यांच्या मुली विद्या आणि स्वप्नल यांनी त्यांचा मृतदेह घरातच ठेवत मृत्यू झाल्याची माहिती लपवून ठेवली. नंतर दोघींनी समुद्रात जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असता यामधील विद्याचा मृत्यू झाला. तर स्वप्नलला पोलिसांनी वाचवलं असून अटक केली आहे. नवापूर स्मशानभूमीच्या समोर बीचवर एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह मिळाला होता. अज्ञात मृतदेह म्हणून ताब्यात घेतल्यानंतर ती आत्महत्या असल्याचा संशय होता. त्यानंतर तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. त्यानंतर आज एक महिला बीचवर आत्महत्या करण्यासाठी आली असता लोकांनी आणि पोलिसांनी तिला बाहेर काढले. यावेळी तिने मंगळवारी सापडलेला मृतदेह आपल्या बहिणीचा असल्याची माहिती दिली.
या दोन्हीही बहिणींच्या वडिलांचा १ ऑगस्टला मृत्यू झाला होता. करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास आपल्याला क्वारंटाईन करतील अशी त्यांना भीती होती. यामुळे त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली नव्हती. तो मृतदेहदेखील ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवत आहोत,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. हरिदास हे रेशनिंग ऑफिसर म्हणून ते काम करत होते. निवृत्त झाल्यानंतर घरात ते एकमेव कमावणारे होते.या प्रकरणात पोलीस अधिक तपस करीत आहेत.