MPSCNewsUpdate : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्वपरीक्षा आता ४ सप्टेंबरला

मुंबई : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे हि परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्वपरीक्षा आता ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’साठी ही परीक्षा घेतली जाईल.
महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० ही परीक्षा आधी ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ९ एप्रिल रोजी एमपीएससीकडून परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. याबाबत परिपत्रक काढून आयोगाने विद्यार्थ्यांना सूचित केले आहे. राज्य सरकारनं ३ ऑगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय कळवला होता.
दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने परीक्षेच्या आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ३ ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.